सातारा @ १५९ : लक्ष्मी टेकडी, गुरुवार पेठ ठरतेय हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:48 IST2020-07-29T17:46:24+5:302020-07-29T17:48:07+5:30
सातारा शहरातील कोरोना बाधितांनी दीडशेचा टप्पा ओलांडला असून, बाधितांची संख्या १५९ वर पोहोचली आहे. शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल ३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारकरांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. शहरात सर्वाधिक रुग्ण गुुरुवार पेठ व लक्ष्मी टेकडी येथे आढळून आल्याने हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागला आहे.

सातारा @ १५९ : लक्ष्मी टेकडी, गुरुवार पेठ ठरतेय हॉटस्पॉट
सातारा : सातारा शहरातील कोरोना बाधितांनी दीडशेचा टप्पा ओलांडला असून, बाधितांची संख्या १५९ वर पोहोचली आहे. शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल ३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारकरांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. शहरात सर्वाधिक रुग्ण गुुरुवार पेठ व लक्ष्मी टेकडी येथे आढळून आल्याने हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागला आहे.
जिल्हा प्रशासन व सातारा पालिकेने केलेल्या उत्तम नियोजनामुळे प्रारंभीचे तीन महिने शहरात कोरोना बाधितांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती; परंतु लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्या अन् परजिल्ह्यातील नागरिकांची घरवापसी झाली.
यानंतर जिल्ह्यासह सातारा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. बांधितांमध्ये तालुका सहाशेच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, सातारा शहरात आकडा १५९ वर पोहोचला आहे.
शहरात प्रामुख्याने गुरुवार पेठ व लक्ष्मी टेकडी परिसरात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पालिका प्रशासन व पंचायत समितीने या भागावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, सारी सदृश रुग्णांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. याशिवाय बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅबही तपासणीसाठी घेतले जात आहे.
लक्ष्मी टेकडी परिसरात आरोग्य यंत्रणेने तपासणी यंत्रणा गतिमान केली आहे. येथील घरांमध्ये कोणतेही अंतर नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न गंभीर आहे. अंतर्गत भागात औषध फवारणीसाठी अग्निशमन बंब जात नसल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत औषध फवारणी केली जात आहे.
शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच सातारकरांची चिंताही वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे बनले आहे.
सारी सदृश रुग्णांचा शोध
सोमवारी रात्री आलेल्या अहवालात लक्ष्मी टेकडी परिसरातील तब्बल १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये सात पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे. यामुळे लक्ष्मी टेकडी परिसरात सातारा पंचायत समिती व पालिकेच्या आरोग्य विभागाने सारी आयएलआयच्या रुग्णांची शोध मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी लक्ष्मी टेकडी परिसरातील ४२ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले.
नगरसेविकेसह पती बाधित
सातारा पालिकेतील महिला नगरसेविकेसह त्यांच्या पतीला कोरोनाची बाधा झाल्याने स्पष्ट झाले आहे. दोघांवरही शहरातील खासगी कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदाशिव पेठेतील त्यांचे निवासस्थान व परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. त्यांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेण्याचे काम दिवसभर सुरू होते.
शहरात ३५ प्रतिबंधित क्षेत्र
विमल सिटी, ६७ बुधवार पेठ, २९८ यादोगोपाळ पेठ, ३२२ मल्हार पेठ, १६५ मंगळाई कॉलनी (गोडोली), २७८ समर्थ दर्शन अपार्टमेंट (यादोगोपाळ पेठ), ५४६ गुरुवार पेठ, ५०५ जीवन छाया सोसायटी (सदर बझार), ३२३ करंजे तर्फ बाबर कॉलनी, २६/क बबई निवास (गोडोली), २४४ बुधवार पेठ, २४४ बुधवार पेठ, जयजवान हाऊसिंग सोसायटी (लक्ष्मीटेकडी), १६ बुधवार पेठ, २९ माची पेठ, १०५९ श्रीराम अपार्टमेंट-शनिवार पेठ, ५४ बुधवार पेठ, ८६३ शनिवार पेठ, ५९३ गुरुवार पेठ, गणेश अपार्टमेंट/गुरुवार पेठ, घोलप बंगला (जगतापवाडी, शाहूनगर), ३६४ यादोगोपाळ पेठ, त्रिमूर्ती कॉलनी (शाहूनगर), प्रभाकुंज बंगला (जगताप कॉलनी), कृष्णाई बंगला (करंजे), शिवनेरी अपार्टमेंट (भवानी पेठ), बी विंग-ठक्कर सिटी, हिंगे हाईट्स-बसाप्पा पेठ, काकडे वाडा-भवानी पेठ, ४८४ करंजे पेठ, १६९ काकडे वाडा-भवानी पेठ, ३०८ गणेश अपार्टमेंट-गुरुवार पेठ, १३४ केसरकर पेठ, दीपलक्ष्मी अपार्टमेंट-रामाचा गोट, आनंदी निवास-सदाशिव पेठ, २४४ अ-१ बुधवार पेठ.