गोव्यात साताऱ्याचा डंका, संतोष शेडगे यांने पटकावला 'आयर्न मॅन' किताब
By सचिन काकडे | Updated: October 11, 2023 15:34 IST2023-10-11T15:31:25+5:302023-10-11T15:34:05+5:30
सर्वांत खडतर स्पर्धा ६ तास ५७ मिनिटांत पूर्ण

गोव्यात साताऱ्याचा डंका, संतोष शेडगे यांने पटकावला 'आयर्न मॅन' किताब
सातारा : पणजी (गोवा) येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत साताऱ्यातील संतोष शेडगे यांनी २ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावून ‘आयर्न मॅन’ बनण्याचा किताब पटकावला. त्यांच्या या यशाने सातारा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा कोरले गेले.
अत्यंत खडतर व शारीरिक क्षमतेचा कस लावणारी ‘आयर्न मॅन’ ही स्पर्धा जगातील सर्वांत कठीण स्पर्धा म्हणून गणली जाते. पणजी येथे झालेल्या स्पर्धेत ५० देशातील तब्बल १ हजार ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. समुद्रातील खारे पाणी, त्यात उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटा या लाटांवर स्वार होऊन दोन किलोमीटर पोहताना दमछाक होऊन जाते.
यानंतर ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावताना शारीरिक क्षमतेचा अक्षरश: कस लागतो. दमट वातावरण व उन्हाचे चटके सहन करून ही स्पर्धा पार करणे म्हणजे एकप्रकारचे दिव्यच असते. तरीदेखील संतोष शेडगे यांनी मोठ्या हिमतीने स्पर्धेचे एक - एक करत सर्व टप्पे ६ तास ५७ मिनिटांत पूर्ण करून ‘आयर्न मॅन’ बनण्याचा किताब पटकावत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरले.
ही अवघड शर्यत पूर्ण करण्यासाठी संतोष शेडगे यांनी शिव स्पिरीटचे शिव यादव यांच्याकडे तीन महिने प्रशिक्षण घेतले. तसेच सुधीर चोरगे यांच्याकडे पोहण्याचा सराव केला. त्यांना आर्यन मॅन डॉ. प्रमोद कुचेकर, कमल उपाध्ये, योगेश ढाणे, आर्यन वुमन सुचिता काटे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.