खंडणीप्रकरणी संदीप शिंदे अटकेत
By Admin | Updated: January 15, 2015 23:19 IST2015-01-15T22:33:24+5:302015-01-15T23:19:29+5:30
काशीळच्या डॉक्टरची तक्रार : अपहरण, मारहाण करून पैसे उकळल्याचा आरोप

खंडणीप्रकरणी संदीप शिंदे अटकेत
सातारा : अवैधरीत्या सोनोग्राफी करीत असल्याचा आरोप करीत एका डॉक्टराला मारहाण व अपहरण करून वीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप शिंदे (वय ३४, रा. कोंडवे, ता. सातारा) यांच्यासह एका युवकाला शहर पोलिसांनी काल, बुधवारी मध्यरात्री अटक केली. संदीप शिंदे हे २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शाहूपुरी मतदारसंघातून ‘राष्ट्रवादी’तर्फे जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. त्यांच्यावर खंडणी, अपहरण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. सिकंदर आजम शेख (३४) यांचे काशीळ येथे रुग्णालय आहे. मंगळवारी (दि. १३) दुपारी दोनच्या सुमारास ते कामानिमित्त इनोव्हा कारमधून साताऱ्यातील विकासनगर येथे आले होते. काम संपवून ते घरी जात असताना दोन दुचाकींवरून मल्लेश मुलगे यांच्यासह पाच युवक आले. त्यांनी गाडी आडवी घालून डॉ. शेख यांना थांबविले. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याच कारमधून त्यांचे अपहरण करून त्यांना राधिका रस्त्यावरील अॅक्सिस बँकेजवळ आणले. बँकेतील एटीएममधून त्यांना जबरदस्तीने ३० हजार रुपये काढण्यास सांगितले. शेख यांनी पैसे काढल्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या चौघांनी त्यांच्याकडून ते पैसे हिसकावून घेतले. अॅक्सिस बँकेसमोरच संदीप शिंदे यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात डॉ. शेख यांना नेण्यात आले. त्यावेळी तेथे संदीप शिंदे होते. ‘अवैधरीत्या तू गर्भलिंग निदान करतोस,’ असे म्हणून शेख यांना तेथेही मारहाण करण्यात आली. त्यांच्या खिशामध्ये असलेली १७ हजारांची रोकड त्यांनी काढून घेतली. तसेच स्टेट बँकेचा दीड लाखांचा धनादेश घेऊन त्याच्यावर शेख यांची स्वाक्षरी घेतली. तीन महागडे गॉगल आणि पेनड्राईव्हही त्यांच्याकडून जबरदस्तीने काढून घेतला. तसेच आणखी वीस लाखांची खंडणीही मागितली. त्यानंतर त्यांना सोडले.
या प्रकारानंतर डॉ. सिकंदर शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून संदीप शिंदेंना काल मध्यरात्री त्यांच्या कोंडवे येथील घरातून अटक केली. मल्लेश मुलगे याला विकासनगरमधून अटक करण्यात आली. याप्रकरणात आणखी चौघे संशयित असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
‘सीसीटीव्ही’मध्ये घटना कैद
डॉ. सिकंदर शेख यांना अपहरणकर्त्यांनी अॅक्सिस आणि आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये आणले होते. हा प्रकार तेथील ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला आहे.
तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. सराटे यांनी दोन्ही बँकेतील सीसीटीव्ही फु टेजही बँकेकडून घेतले असून, ते तपासण्याचे काम रात्री उशिरापर्र्यंत सुरू होते.
गर्भलिंग चाचणीचा डॉक्टरवर गुन्हा
तक्रारदार डॉ. सिकंदर शेख यांच्यावर गर्भलिंग निदानप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. या प्रकरणातूनच संशयितांनी त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिंदे जिल्हा रुग्णालयात
संदीप शिंदेंना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना मंगळवार
(दि. २०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्यानंतर पोलीस त्यांना कारागृहाकडे नेत असताना त्यांनी प्रकृती बिघडल्याचे सांगितले. तत्काळ पोलिसांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या ते रुग्णालयातच उपचार घेत आहेत.
संदीप शिंदेंना अटक झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी न्यायालयात आणि जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. संदीप शिंदे हे राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक, कला-क्रीडा आणि ग्रंथालय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.