विरोधानंतरही संदीप कोठडीत
By Admin | Updated: January 17, 2015 00:12 IST2015-01-16T22:56:04+5:302015-01-17T00:12:28+5:30
खंडणी प्रकरण : रुग्णालयात उपचार घेताना वैद्यकीय रिपोर्ट ‘नॉर्मल’

विरोधानंतरही संदीप कोठडीत
सातारा : डॉक्टरचे अपहरण करून त्यांच्याकडे वीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे याचा आज, शुक्रवारी ताबा घेत त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. तत्पूर्वी त्याने छातीत दुखत असल्याचे सांगून जिल्हा रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ घेण्यास नकार दिला होता; मात्र पोलिसांनी वैद्यकीय अहवालाचा आधार घेत त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी पोलीस कोठडीत आणले. दरम्यान, या प्रकरणातील अन्य चार संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सातारा तालुक्यातील काशीळ येथील डॉ. सिकंदर शेख यांना मारहाण करून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक, कला-क्रीडा, ग्रंथालय सेलचा प्रदेश उपाध्यक्ष तथा शाहूपुरी गटाचा जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे याच्यासह मल्लेश मुलगे याच्यावर खंडणी, अपहरण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून, दोघांनाही काल, गुरुवारी पहाटे त्यांना अटक झाली. या प्रकरणात अन्य चौघांचा सहभाग असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटकेनंतर संदीप शिंदे आणि मल्लेश मुलगे या दोघांना न्यायालयाने मंगळवार (दि. २0) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (पान ९ वर)
वैद्यकीय चाचणीनंतर संदीप ‘फिट’
शुक्रवारी सकाळी दोघांचीही रवानगी पोलीस कोठडीत होणार असल्याची कल्पना संदीप आणि मल्लेशला देण्यात आली. त्यानुसार दोघांनाही ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. मात्र, संदीप पुन्हा एकदा छातीत दुखत असल्याचे सांगत झोपून राहिला. त्याने पोलीस कोठडीत जाण्यास नकार दिला. यावेळी संदीपचे काही कार्यकर्ते जिल्हा रुग्णालय आवारात जमले होते. त्यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, चाचण्यांनतर छातीत दुखत नसल्याचे समोर आले. (संबंधित वृत्त हॅलो १)