भाऊगर्दी थोपविण्यासाठी ‘साम-दाम-दंड’!
By Admin | Updated: April 10, 2015 23:46 IST2015-04-10T22:45:16+5:302015-04-10T23:46:30+5:30
राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष : इच्छुकांना थोपविण्यासाठी नेत्यांना करावी लागणार दमछाक--सांगा डीसीसी कोणाची ?

भाऊगर्दी थोपविण्यासाठी ‘साम-दाम-दंड’!
सागर गुजर - सातारा -जिल्हा बँक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अंतर्गतच संघर्ष मोठ्या प्रमाणावर उफाळल्याचे पाहायला मिळत आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याकडून मागील निवडणुकीत बँकेची सत्ता आपल्याकडे खेचून आणणाऱ्या राष्ट्रवादीला आता स्वकीयांच्या विरोधाशीच संघर्ष करावा लागत असून. इच्छुकांना थोपविण्यासाठी ‘साम, दाम, दंड’ नीती अवलंबावी लागणार आहे.माजी खासदार व जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी वाई तालुका विकास सेवा सोसायटीतून त्यांचे चिरंजीव नितीन पाटील यांना जिल्हा बँकेची वाट मोकळी केली असून, स्वत: खरेदी विक्री संघातून उमेदवारी अर्ज भरल्याने याठिकाणी त्यांच्याच पक्षातील विद्यमान उपाध्यक्ष रवींद्र कदम, विश्वासराव निंबाळकर यांची कोंडी होऊन बसली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत २१ संचालकांच्या जागांसाठी तब्बल १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज भरणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीतील नेते व कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. काही ठिकाणी दुरंगी तर बहुतांश ठिकाणी चौरंगी लढती होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत. कोरेगावातून लालासाहेब शिंदे यांच्यासोबत राहुल कदम, सुनील खत्री यांचा अर्ज आहे.
खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादीला खरी डोकेदुखी आहे. खंडाळा तालुका विकास सोसायटीतून या पक्षातील बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय ढमाळ, पक्षप्रतोद नितीन भरगुडे-पाटील, माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, लोणंदचे माजी सरपंच अनंत तांबे, नायगावचे माजी सरपंच राजेंद्र नेवसे, किशोर साळुंखे यांनी सोसायटीतून अर्ज भरले आहेत.
महिला राखीव मधून गीतांजली कदम, कांचन साळुंखे, जयश्री कदम, अनुपमा फाळके, सुनेत्रा शिंदे यांच्यासह तीस महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अनुसुचित जातीमधून संचालक प्रकाश बडेकर यांना सहा उमेदवारांना तोंड द्यावे लागणार आहे.
कृषी उत्पादनमधून दादाराजे खर्डेकर निवडून आले होते. त्यांच्याविरोधात आमदार बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक राजू भोसले यांचे अर्ज आहेत. बँकांमधून राजेश पाटील यांनाही स्वकीयांशी संघर्ष करावा लागणार आहे. औद्योगिक विणकरमधून तर अनिल देसाई, विक्रमबाबा पाटणकर, चंद्रकांत जाधव यांचे अर्ज असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शिवेंद्रसिंहराजे बिनविरोध शक्य
सातारा तालुका सोसायटी मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात खासदार उदयनराजे समर्थक बाबासो घोरपडे यांनी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी दोन्ही राजे एकत्र चर्चेतून शिवेंद्रसिंहराजे बिनविरोध होऊ शकतात, उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे हे दोघे बंधू एकत्र बसून हा तिढा सोडवू शकतात.
राजपुरे सुटले इतर अडकले...
जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादीतच संघर्ष पेटला असताना महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे बिनविरोध सुटले आहेत. तर इतर उमेदवारांची गोची होऊन बसली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी करण्याची वेळ प्रस्थापितांवर आली आहे.