‘सह्याद्री’ झालं, ‘कृष्णा’कडे लक्ष ; लढत दुरंगी की तिरंगी; सभासदांमध्ये तर्कवितर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 18:21 IST2020-03-16T18:17:32+5:302020-03-16T18:21:46+5:30
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली अन् क-हाड उत्तरचे आमदार व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. त्यामुळे त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी गारठले. मनोज घोरपडेंनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला.

‘सह्याद्री’ झालं, ‘कृष्णा’कडे लक्ष ; लढत दुरंगी की तिरंगी; सभासदांमध्ये तर्कवितर्क
प्रमोद सुकरे ।
क-हाड : गत महिन्यात कºहाड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कारखाना बिनविरोध झाल्याने त्यांची राज्यात आणखी पत वाढली. पण तालुक्यातील तितक्याच मोठ्या ‘कृष्णा’ कारखान्याचं इलेक्शन काही महिन्यांत होणार आहे. कृष्णेची निवडणूक बिनविरोध होण्याची सूतराम शक्यता नाही; पण लढत दुरंगी की तिरंगी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली अन् क-हाड उत्तरचे आमदार व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. त्यामुळे त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी गारठले. मनोज घोरपडेंनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. तर धैर्यशील कदमांनी मौनच ठेवले. त्यामुळे बाळासाहेबांचा बिनविरोधचा मार्ग सुकर झाला. त्यांच्या इच्छुकांनी डोकेदुखी वाढविली. पण त्यावर त्यांनी गोड उपायही काढला. अन् बाळासाहेब ‘हिरो’ ठरले.
आता तालुक्यातील ‘कृष्णा’ कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. पण ‘सह्याद्री’प्रमाणे ‘कृष्णा’ची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता सूतराम नाही. पण यात कोणाकोणाची किती पॅनेल रिंगणात असणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
सध्या ‘कृष्णा’त डॉ. सुरेश भोसले यांची सत्ता आहे. भोसले परिवार भाजपवासी झाल्याने ते अनेकांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे कारखाना भाजपच्या ताब्यात आहे. अन् तो त्यांच्या ताब्यात ठेवायचा नाही, असा प्रचार करून विरोधक सत्तांतरासाठी चाल खेळत आहेत. त्यात माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थक डॉ. इंद्रजित मोहिते यांचा समावेश आहे.
कृष्णेच्या फडात उतरण्याची तयारी डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या तिघांनीही चालविली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत कृष्णेची निवडणूक गतवेळेप्रमाणे तिरंगीच होणार असे चित्र एका बाजूला दिसत आहे. तर दुसºया बाजूला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने, मुंबई बाजार समिती निवडणुकीप्रमाणे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे पॅनेल, असा प्रयोग होऊ शकतो का? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. सभासद शेतकरी त्याबाबत तर्कवितर्क लढवित असून, नेमके काय घडणार? हे पाण्यासाठी सर्वांनाच थोडे थांबावे लागणार आहे.
राजकारणात काहीही घडू शकते
भोसलेंना रोखण्यासाठी डॉक्टर व इंजिनिअर मोहिते एकत्र येणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अविनाश मोहिते यांनी अनेक सभांमधून मी कोनाशी जुळवून घेणार या अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असे सांगितले आहे. तर डॉ. इंद्रजित मोहिते यांनीही मी एकतर्फी प्रेम करणारा माणूस नाही. मी यशवंतराव मोहिते यांच्या नावाने पॅनेल उभे करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही मोहिते एकत्र येण्याची शक्यता धुसर वाटत असली तरी ‘राजकारणात काहीही घडू शकते,’ हेही तितकेच खरे आहे बरं !