जखिणवाडीसाठी ‘सचिन’चा षटकार
By Admin | Updated: August 28, 2014 23:02 IST2014-08-28T22:37:59+5:302014-08-28T23:02:55+5:30
सौरव्हिलेज संकल्पना : खासदार फंडातून एक कोटीचा निधी

जखिणवाडीसाठी ‘सचिन’चा षटकार
कऱ्हाड : ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी जखिणवाडीच्या विकासासाठी सुमारे एक कोटीचा निधी दिला आहे़ या निधीचा सौरव्हिलेजसाठी प्रामुख्याने वापर करण्यात येणार आहे,’ अशी माहिती सरपंच अॅड़ नरेंद्र नांगरे-पाटील यांनी दिली़
जखिणवाडीच्या वाटचालीची व मिळालेल्या निधीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी उपसरपंच पांडुरंग कणसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, पी़ जी़ पाटील, रामराव नांगरे-पाटील यांच्यासह जखीवाडी ग्रमपंचायत सदस्यांची उपस्थिती होती़
सरपंच पाटील म्हणाले, ‘नुकताच जखिणवाडी गावाने स्वच्छ ग्राम स्पर्धेत पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळवला आहे़ गावाला आतापर्यंत विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे़
सन २०१० मध्ये निर्मलग्राम, पर्यावरण समृद्धगाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, २०१२ मध्ये तंटामुक्त गाव विशेष पुरस्कार, २०१३ मध्ये पंचायत राज, वसंतराव नाईक पाणी व सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार २०१४ मध्ये विकासरत्न, स्वच्छग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम तर विभागात दुसरा क्रमांक मिळाला आहे़ तसेच पंचायत राज पुरस्कार व गौरव ग्रामसभा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे़ ग्रामसेवक सदाशिव खांडके यांनाही ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे़
यासर्व पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर यांच्याकडून निधी मिळविण्यासाठी गत वर्षभर पाठपुरावा करीत होतो, त्यांची भेट घेऊन ‘जखिणवाडीची यशोगाथा’ हे पुस्तक त्यांना भेट दिले़ (प्रतिनिधी)
जखिनवाडीचा गौरव
जखीणवाडी गावाने आजपर्यंत केलेल्या कामाचे पुस्तक वाचल्यानंतर सचिन तेंडूलकर खूप प्रभावीत झाले. त्यांनी ग्रामस्थांची आस्थेने चौकशी केली. तसेच या गावाच्या उत्कर्षाची दखल घेत स्वत:च्या खासदार फंडातून सुमारे एक कोटीचा निधी जखीणवाडीला दिला आहे़ यातून सौरव्हिलेज बरोबरच सिमेंट काँक्रीटच्या बंदिस्त गटारीही बांधण्यात येणार आहेत़
‘जखिणवाडीची यशोगाथा’ या पुस्तकाची पाहणी खासदार सचिन तेंडुलकर यांनी केली. समवेत सरपंच नरेंद्र नांगरे-पाटील उपस्थित होते. त्यानंतरच त्यांनी या गावाच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली.