अफवा बिबट्याची; पण सापडले मांजर !

By Admin | Updated: April 4, 2015 00:03 IST2015-04-03T22:18:52+5:302015-04-04T00:03:01+5:30

कोपर्डे हवेलीत पळापळ : विहिरीत पडलेल्या ऊदमांजराला ग्रामस्थांकडून जीवदान

Rumor leopard; But the cat found! | अफवा बिबट्याची; पण सापडले मांजर !

अफवा बिबट्याची; पण सापडले मांजर !

कोपर्डे हवेली : येथील एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली. ग्रामस्थांसह वनविभागाचे अधिकारी संबंधित विहिरीजवळ पोहोचले. मात्र, विहिरीत बिबट्या नसून मोठे ऊदमांजर पडल्याचे स्पष्ट झाले. ग्रामस्थांनी दोन तास प्रयत्न करून त्या मांजराला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला वनक्षेत्रात सोडून देण्यात आले.कोपर्डे हवेली येथे किवळच्या मार्गावर रेल्वे फाटक आहे. या रेल्वे फाटकापासून काही अंतरावर विकास नलवडे यांचे शेत असून, या शेतामध्ये विहीर आहे. शुक्रवारी सकाळी विहिरीत बिबट्यासदृश प्राणी पडल्याचे काही शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. तो प्राणी जीव वाचविण्यासाठी विहिरीतच धडपडत होता. शेतकऱ्यांनी याची माहिती दिल्यानंतर ग्रामस्थही विहिरीकडे धावले. काही ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर विकास नलवडे, सोमनाथ सावंत, नीलेश नलवडे, अप्पासाहेब चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी त्या प्राण्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. बराचवेळ प्रयत्न करून यश येत नव्हते. अखेर सापळा आणण्यात आला. त्या सापळ्याचा दरवाजा उघडा ठेवून तो विहिरीत सोडण्यात आला. तो प्राणी विहिरीत सोडलेल्या सापळ्यात स्वत:हून गेला. त्यानंतर ग्रामस्थांनी सापळ्याचा दरवाजा बंद करून त्या प्राण्याला कोंडले. तसेच सापळा विहिरीतून बाहेर काढण्यात आला. सुमारे दोन तास हे प्रयत्न सुरू होते.दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी एस. बी. पवार, बी. एस. कदम त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी त्या प्राण्याची पाहणी करून तो बिबट्या नव्हे, तर मोठे ऊदमांजर असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊदमांजरावर प्राथमिक उपचार करून त्याला ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या मदतीने त्याला दुपारी पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले. भक्ष्याच्या शोधात आल्यानंतर ते ऊदमांजर विहिरीत पडले असावे, असा वनाधिकाऱ्यांचा कयास आहे. (वार्ताहर)

Web Title: Rumor leopard; But the cat found!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.