गोल बाग बनलीय बांबूचं बेट!
By Admin | Updated: April 7, 2016 00:03 IST2016-04-06T21:42:56+5:302016-04-07T00:03:37+5:30
तयारी पाडव्याची : सातारकर उभारणार आठ फुटांपासून पस्तीस फुटांपर्यंतच्या गुढ्या

गोल बाग बनलीय बांबूचं बेट!
सातारा : चैत्रापूर्वीच वैशाखवणवा पेटला असला, तरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच येत्या शुक्रवारी नववर्षाचे परंपरेप्रमाणे स्वागत करण्यास सातारकर सज्ज झाले आहेत. गुढ्या उभारण्याची जोरदार तयारी सुरू असून, राजवाड्याजवळील गोल बागेला बांबूच्या बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहेत. आठ फुटांपासून पस्तीस फुटांपर्यंत विविध उंचीचे बांबू उपलब्ध आहेत.
उंचच उंच बांबूंचा वेढा पडल्याने गोल बागेचे रूपडे बदलून गेले आहे. ओले आणि वाळके अशा दोन्ही प्रकारांत बांबू उपलब्ध असल्याने बांबूच्या या बेटाला सुरेख रंगसंगतीही प्राप्त झाली आहे. प्रामुख्याने साताऱ्यातील स्थानिक मांडववाले या ठिकाणी बांबूचा व्यवसाय करीत आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागांमधून बांबू कापून विक्रीस आणण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने बामणोली आणि मेढा भागात बांबूची बेटे मोठ्या संख्येने आहेत. नव्याने बांबूची लागवड फारशी होत नाही; परंतु अनेक गावांमध्ये पूर्वजांनी केलेल्या लागवडीमुळे बांबूची मोठी बेटे तयार झाली आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र अशी बेटे दिसतात. गावोगावी गुढीपाडव्याच्या आठवडाभर आधी बेटांचे मालक बांबूची कापणी मजूर लावून
करून घेतात. हे मजूर सामान्यत: मालकच नेमत असले, तरी
काही मांडववाले स्वत: तोड करूनही बांबू आणतात. मजूर लावले असल्यास ते बांबू तोडून, साफ करून देतात.
पेरांजवळ उगवलेले कोंब कोयत्याने खुडून तासून मगच बांबू विक्रेत्यांना दिले जातात.
बांबू आतून पूर्णपणे पोकळ असतो; मात्र तरीही वजन पेलण्याची ताकद बांबूमध्ये असते. अर्थात प्रत्येक बांबू पूर्णपणे पोकळ असतो असेही नाही. काही नग तळाच्या बाजूला भरीव असतात; मात्र दोन ते तीन फुटांच्या पुढे मात्र बांबू पोकळच असतो. वाळलेला असो वा हिरवा, बांबूच्या मजबुतीत फारसा फरक पडत नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, पाडव्याच्या गुढीसाठी हिरव्या बांबूला अधिक मागणी असल्याचेही ते सांगतात. (प्रतिनिधी)
ग्राहक बघून ठरतेय किंमत
गुढीच्या बांबूची किंमत फुटावर ठरत असली तरी काही वेळा ती नगावरही ठरते. किंमत नगावर सांगायची की फुटांवर, याचा निर्णय विक्रेते ग्राहकाकडे पाहून घेतात. सध्या सरासरी वीस रुपये प्रतिफूट दर सुरू आहे. मात्र, नगावर घेतल्यास दीडशे, दोनशे, अडीचशे रुपयांपर्यंत बांबू उपलब्ध होत आहे. शहरात ग्रामीण भागातून सणासुदीच्या खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा ग्राहकांना नगावरच बांबूची विक्री करावी लागते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
बामणोली-कास भाग समृद्ध
जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये बांबूची उपलब्धता असली तरी जावळी तालुका विशेषत: बामणोली-कास परिसर आणि मेढा परिसर बांबूच्या दृष्टीने समृद्ध आहे. याखेरीज गावोगावी पूर्वीच्या काळी केलेल्या लागवडीवरच बांबूच्या बेटांचे प्रमाण अवलंबून असते. बांबूची लागवड शेतात, बांधावर न करता राहत्या घराजवळ बेट लावले जाते. काही ठिकाणी ओढ्याकाठीही बांबूची बेटे असून, ओढ्याला पूर आल्यास प्रवाह रोखण्याचे काम ही बेटे करतात.