कासजवळ रानडुकरांचा धुमाकूळ
By Admin | Updated: January 2, 2015 00:06 IST2015-01-01T21:47:19+5:302015-01-02T00:06:14+5:30
कुसुंबी मुरा : शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांचे नुकसान; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

कासजवळ रानडुकरांचा धुमाकूळ
कुडाळ : कास पठारावर बांधण्यात आलेल्या संरक्षक कुंपणामुळे रानडुकरांना रस्ताच मिळत नसल्यामुळे पठाराच्या बाजूच्या गावांमध्ये पंधरा ते वीस रानडुकरांने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. पठारावरील कुसुंबीमुरा येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे या रानडुकरांच्या कळपाने नुकसान केले आहे. नुकसान केलेल्या पिकांचा पंचनामा व्हावा व योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कास पठरराला संरक्षक जाळीदार कंपाउंड असल्यामुळे रानडुकरांना वनविभागाच्या हद्दीत जाण्याचा मार्गच मिळत नसल्यामुळे अशी रानडुकरे आजूबाजूच्या गावात शिरून नुकसान करत आहेत. शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने हातातोंडाला आणलेल्या ज्वारी पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले आहे. कुसुंबीमुरा येथील शशिकांत आखाडे, ज्ञानेश्वरी आखाडे, किसन आखाडे, गणपत आखाडे या शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी पिकाचे या कळपाने नुकसान केले आहे. तसेच एकीव, एकीवमुरा, सह्याद्रीनगर, सांगवीमुरा, दंदमुरा या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील नुकसान केले आहे.
तरी महसूल विभागाने या शेतीपिकांची पाहणी करून पंचनामा करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
वनविभागाचा कोणताही वनमजूर, वनकर्मचारी, कास पठाराच्या गावांमध्ये फिरकतदेखील नाही. तर गावकऱ्यांनी वन्यप्राण्यांची माहिती देऊनही वनविभागाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तरी वनविभागाने हा कळप जंगलव्याप्त भागात हुसकावून लावावा, अशी मागणी पठारावरील गावांमधील नागरिक करत आहेत.
रानडुकरांनी ज्वारी पिकात शिरून नुकसान केले आहे. रात्री येणारी रानडुकरे आता तर दिवसांदेखील पिकांत शिरत असल्यामुळे शेतात जाण्याचीदेखील भीती वाटत आहे.
-ज्ञानेश्वर आखाडे शेतकरी, कुसुंबीमुरा