रोपं करपली... मनं चरकली!

By Admin | Updated: June 30, 2014 23:56 IST2014-06-30T23:55:04+5:302014-06-30T23:56:39+5:30

जावलीकर चिंतेत : एकुलत्या एका हंगामात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Ropan karapali ... mind charlakali! | रोपं करपली... मनं चरकली!

रोपं करपली... मनं चरकली!

दत्ता पवार ल्ल कुडाळ
संपूर्ण जिल्ह्यात जावली तालुका हा अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, यावर्षी जूनच्या सुरुवातीला पावसाने थोडीफार हजेरी लावली. या धुळवाफेतच शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता पिकांनी डोकं वर काढलेले असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना वर्षातून एकच पीक घेता येत असल्यामुळे हा हंगाम महत्त्वाचा असतो. मात्र, या हंगामातच शेतकऱ्यांवर वेळेत पाऊस न झाल्याने दुबार पेरणीसह पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावले आहे.
तालुक्यात आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. मार्चपासून तालुक्यातील काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन गावांना टँकर सुरू करावे लागले आहेत. दरवर्षी हे टँकर जूनपर्यंतच सुरू राहतात. मात्र, यावर्षी पावसाने दडी मारल्याने जून महिना संपला तरीही तालुक्यात ८ टँकरद्वारे १९ गावे ९ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. आता तर हे टँकर भरण्याइतकीही तालुक्यातील विहिरींची पाणीपातळी उरली नसल्याने सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी येथील विहिरीतून टँकर भरावे लागत आहेत, एवढी भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
दोन-दोन मोठी धरणे तालुक्यात असूनही तालुक्यातील १० टक्के क्षेत्रदेखील ओलिताखाली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडून आजही पारंपरिक पिके घेतली जातात. हंगामी पिकात भात, वाटाणा, कडधान्ये, संकरित ज्वारी, सोयाबीन, भुईमूग अशी महत्त्वाची पिके घेतली जातात. जूनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड केली. वेण्णा नदीलाही थोडेफार पाणी वाहू लागले आणि तालुक्यातील पश्चिम भागात केळघर, कुडाळ, करहर या विभागात शेतकऱ्यांनी शंभर टक्के पेरण्या पूर्ण केल्या. पिके जोमात आलेली असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. आणखी काही दिवस पाऊस पडलाच नाही तर भयानक स्थिती निर्माण होईल.

Web Title: Ropan karapali ... mind charlakali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.