लूटमार, दरोड्याच्या घटना गुन्हे शाखेकडून उघडकीस

By Admin | Updated: June 26, 2014 00:40 IST2014-06-26T00:38:52+5:302014-06-26T00:40:44+5:30

साताऱ्यातील दोघांना अटक : लाखोंचा ऐवज जप्त

Robberies, robberies, incidents of crime exposed by crime branch | लूटमार, दरोड्याच्या घटना गुन्हे शाखेकडून उघडकीस

लूटमार, दरोड्याच्या घटना गुन्हे शाखेकडून उघडकीस


सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने २०१३ मध्ये जिल्ह्यात घडलेले लूटमार व दरोड्याचे तीन गुन्हे उघडकीस आणून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यांच्या प्रकरणात लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला.
याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पेट्रोलिंग करताना तेजस भारत भांडवलकर (वय १८, रा. कृष्णानगर, सातारा) आणि स्वप्निल हरिश्चंद्र कांबळे (वय २०, रा. संगमनगर, सातारा) यांना अटक केली होती. या दोघांनीही लूटमार केल्याचे कबूल केले होते.
दि. २७ नोव्हेंबर २०१३ रोजी सातारा तालुक्यातील शहापूरजवळ मंगेश लक्ष्मण जाधव (वय ४९, रा. करंडी) या व्यापाऱ्याला गाडी आडवी मारून मारहाण करीत डोळ्यात चटणीची पूड टाकण्यात आली होती. यावेळी सोन्याची चेन व २० हजारांची रोकड नेण्यात आली होती. याप्रकरणात तेजस भांडवलकर, स्वप्निल कांबळेचा समावेश होता. करंडी, ता. सातारा येथे नोव्हेंबर २०१३ मध्ये सायंकाळच्या सुमारास पाणी मागण्याचाा बहाणा करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी हिसकावून नेण्यात आले होते. यामध्ये तेजस भांडवलकर, स्वप्निल कांबळे यांच्याबरोबरच हसन मस्जिद शेख (रा. संगमनगर, सातारा) आणि अन्य दोघांचा समावेश होता.
जून २०१३ मध्ये सालपे घाटातही ट्रकला दुचाकी आडवी मारून चालकाला मारहाण करून लुटण्यात आले होते. यावेळी २३ हजारांची रोकड नेण्यात आली होती. याप्रकरणी हरेंद्र मोहन सिंग (रा. कळंबोली) यांनी तक्रार दिली होती. या लुटमारीतही तेजस, स्वप्निलबरोबरच फरार असणाऱ्या इतर दोघांचा समावेश होता.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शामराव मदने, हवालदार संजय पवार, प्रवीण फडतरे, नितीन शळके, नितीन भोसले, दीपक मोरे, संजय शिंदे, पृथ्वीराज घोरपडे, संतोष जाधव आदींनी कारवाईत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
 

Web Title: Robberies, robberies, incidents of crime exposed by crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.