जमिनीचा मोबदला न मिळाल्याने रस्ता ट्रॅक्टरने खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:16+5:302021-06-26T04:26:16+5:30
नागठाणे : वळसे (ता. सातारा) येथून बीव्हीजी फूड पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जमिनी घेऊनही अद्याप त्याचे पैसे न मिळाल्याने संतप्त ...

जमिनीचा मोबदला न मिळाल्याने रस्ता ट्रॅक्टरने खोदला
नागठाणे : वळसे (ता. सातारा) येथून बीव्हीजी फूड पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जमिनी घेऊनही अद्याप त्याचे पैसे न मिळाल्याने संतप्त बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर चर मारून तो काही काळासाठी बंद केला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. जमिनीचे पैसे लवकरात लवकर मिळावेत, अन्यथा हा रस्ता कायमस्वरूपी बंद करून वहिवाटीस पुन्हा ताब्यात घेण्यात येईल, असा इशारा शिवाजी राजाराम कदम, परशुराम विठोबा कदम, संतोष विठ्ठल कदम, नवनाथ विठ्ठल कदम व धनाजी विठ्ठल कदम या बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, बीव्हीजीच्या फूड पार्कसाठी जाणाऱ्या रस्त्यासाठी वळसे येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या. वळसे येथून महादेव मंदिरमार्गे डोंगरातून हा रस्ता देगाव हद्दीत असलेल्या फूड पार्कसाठी तयारही करण्यात आला. त्यानंतर तीन वर्षांपासून या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र या रस्त्यासाठी वळसे गावातल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांना अद्यापही कोणताच मोबदला मिळाला नाही. या बाधित शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाने रक्कम संबंधित विभागाकडे दिली असल्याचे हे शेतकरी सांगतात. मात्र अजूनपर्यंत केवळ कागदोपत्री भूसंपादन केले असून रस्ता तयार केला. त्याचे डांबरीकरणही केले, पण शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जमिनीचे अद्यापही खरेदीखतच केले नसल्याचे त्यानी सांगितले. त्यामुळे तीन वर्षे ओलांडूनही त्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.
त्यामुळे शुक्रवारी येथील संतप्त बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टरने चर मारून काही काळासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून एक प्रकारे इशाराच दिला. लवकरात लवकर संपादित जमिनीचे खरेदीखत करून व्याजासह संपूर्ण रक्कम मिळावी, अन्यथा कायमस्वरूपी हा रस्ता बंद करून जमीन पुन्हा वहिवटण्यासाठी ताब्यात घेणार, असा इशारा या वेळी या शेतकऱ्यांनी दिला आहे.