संगमनगर धक्का ते घाटमाथ्यापर्यंत रस्ता होणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:07+5:302021-04-06T04:38:07+5:30
कऱ्हाड-चिपळूण-गुहागर महामार्गावरील पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का ते घाटमाथा या तेरा किलोमीटर अंतराच्या कामासाठी १६.८५ कोटीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ...

संगमनगर धक्का ते घाटमाथ्यापर्यंत रस्ता होणार चकाचक
कऱ्हाड-चिपळूण-गुहागर महामार्गावरील पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का ते घाटमाथा या तेरा किलोमीटर अंतराच्या कामासाठी १६.८५ कोटीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. तशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली होती. या मार्गाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी राजकीय व सामाजिक संघटनांनी आंदोलने केली होती. तसेच संगमनगर धक्का, गोष्टवाडी, राममळा, दास्तान, रासाटी, कोयनानगर, हेळवाक, शिवंदेश्वर, नेचल, बोपोली व घाटमाथा या गावांतील ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या व्यथा मांडत, हा रस्ता दुरुस्त होण्याबाबत विनंती केली होती.
माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी देखील खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. त्यानुसार खासदार पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कोल्हापूर विभाग कार्यकारी अभियंता संजय सांगावकर यांना २२ मे २०२० रोजी पत्र लिहून तशी सूचना केली होती. त्याचबरोबर दिल्ली येथे लोकसभेच्या अधिवेशन काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून तशी मागणी केली होती. खासदार पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- चौकट
कोकणचा प्रवास खडतर
कोकणच्या दिशेला जाणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र पाटण तालुक्यात पावसाळ्यामध्ये जादा पाऊस पडत असतो. त्यामुळे या मार्गावर खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा होत असते. कोयना विभागासह इतर डोंगरी भागातील लोकांना या मार्गावरून पावसाळ्यात प्रवास करणे अडचणीचे व जिकिरीचे ठरते. तसेच या मार्गाची दुरवस्था झाल्याने कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.