कऱ्हाड-पुसेसावळी मार्गावर वाहतूक दाट आहे. तसेच हा मार्ग मल्हारपेठ-पंढरपूर मार्गाला जोडला जातो. सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांना व कऱ्हाड व खटाव या दोन तालुक्यांना जोडणारा हा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक जास्त असते. याच मार्गावर वाघेरी फाटा ते शामगाव घाट यादरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यापूर्वी लहान असणारे खड्डे आता विस्तारले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच या खड्ड्यात पाणी साचून राहिल्यामुळे खड्डे लक्षात येत नाहीत. परिणामी, चालकांची फसगत होते. चालक संभ्रमित झाल्यामुळे अपघात होत आहेत. त्यामध्ये प्रवाशांना दुखापत होत असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रात्री हे खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन ते चार किलोमीटर प्रवासासाठी सुमारे अर्धा तास वेळ लागत आहे. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी चालक व प्रवाशांतून होत आहे.
कऱ्हाड ते पुसेसावळी मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST