लहानग्यांमध्ये मल्टी सिस्टीम इन्लमेटरीचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:09+5:302021-09-02T05:24:09+5:30
सातारा : कोरोना झालेल्या बालकांना आता मल्टी सिस्टीम इन्लमेटरी सिन्ड्रोमचा धोका वाढला आहे. ताप, अंगावर पुरळ, हातापायाला सूज ...

लहानग्यांमध्ये मल्टी सिस्टीम इन्लमेटरीचा धोका वाढला
सातारा : कोरोना झालेल्या बालकांना आता मल्टी सिस्टीम इन्लमेटरी सिन्ड्रोमचा धोका वाढला आहे. ताप, अंगावर पुरळ, हातापायाला सूज येणे अशी याची लक्षणे आहेत. विशेष म्हणजे आरटीपीसीआर करून याचे निदान होत नाही. त्यासाठी अँटीबॉडी टेस्ट करणं हाच पर्याय असतो. त्यामुळे लहानग्यांमध्ये अशी काही लक्षणे दिसू लागली तर त्यावर तातडीने तज्ज्ञांकडे जाणं हिताचे ठरत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जिल्ह्यातील सुमारे ४५० मुलांना बाधा झाली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतरही मुलांना मल्टी सिस्टीम इन्लमेटरीचा धोका असल्याने पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यात रक्ताची व इकोकार्डियोग्राफीची तपासणी करणे गरजेचे असते. लहान मुलांच्या हृदयावर व रक्त प्रसारणावर गंभीर परिणाम होऊ शकत असल्याने लवकर निदान आणि उपचार हेच त्यावरील उपाय आहेत.
लहान मुलांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही विविध आजारांचा त्रास होत आहे. यात स्नायू दुखणे, अशक्तपणा, वास आणि चव न येणे तसेच थकवा दिसून येतो. कोविड पश्चात तीन ते चार आठवड्यानंतर मल्टी सिस्टीम इन्लमेटरीचा आजार आढळून येत आहे. त्यामुळे पालकांनी कोरोना पश्चातही मुलांची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.
कोट :
कोविड होऊन गेल्यानंतर दोन ते पाच आठवड्यांनी या आजाराची लक्षणे दिसू लागतात. सहा वर्षांखालील मुलांच्या तुलनेत ६ ते १२ वर्षे वयोगटात या आजाराचे प्रमाण दुप्पट आणि १२ ते १८ या वयोगटात अर्थात किशोरवयीन मुलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक वाढत आहे.
- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ, सातारा
लहान मुलांमध्ये मल्टी सिस्टीम इन्लमेटरीचा धोका आढळून आला आहे. कोविड होऊन गेल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी याचा त्रास सुरू होतो. यात शरीरातील एक किंवा जास्त अवयवांवर संसर्गाचा परिणाम होतो. किशोरावस्थेतील मुलांमध्ये एमआयएस-सी या आजाराचे प्रमाण जास्त आहे. अतिदक्षता विभागात या मुलांवर उपचार केले जातात.
- डॉ. देवदत्त गायकवाड,
बालरोगतज्ज्ञ, सातारा
चौकट
या लक्षणांकडे असू द्या लक्ष
सतत खोकला येणे, ताप येणे, धाप लागणे, जोराने श्वास घेणे, अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणे कोरोनानंतर आढळून येत आहेत. ही लक्षणे कायम राहिल्यास कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हातापायावर चट्टे, सतत अशक्तपणा जाणवणे, अंगाला, हातापायाला सूज ही लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता त्यावर तातडीने उपचार घेणे आवश्यक बनले आहे.
१५ वर्षांखालील मुलं पॉझिटिव्ह
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत १५ वर्षांखालील ३५० हून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील बहुतांश बालकांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती. अनेकांवर होमआयसोलेशनमध्येच उपचार करण्यात आले. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे.