पापण्यांमागच्या काळोख्या विश्वात सुखस्वप्नांचा उदय!

By Admin | Updated: August 24, 2014 22:37 IST2014-08-24T21:56:32+5:302014-08-24T22:37:37+5:30

अनोखा सोहळा : दृष्टिहीन दाम्पत्याने सत्यशोधकी पद्धतीने सुरू केला सहप्रवास

The rise of the illusory dream of the celestial world! | पापण्यांमागच्या काळोख्या विश्वात सुखस्वप्नांचा उदय!

पापण्यांमागच्या काळोख्या विश्वात सुखस्वप्नांचा उदय!

राजीव मुळ्ये - सातारा --सातारा : सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले आणि आद्यशिक्षिका सावित्रीबार्इंना वंदन करून अलका आणि संतोष यांनी रविवारी सत्यशोधकी पद्धतीने सहजीवनाला सुरुवात केली. एकमेकांना साथ देण्याबरोबरच परिवर्तनाच्या रस्त्यावरून चालण्याची शपथ घेतली. दृष्टिहीन वधुवरांच्या पापण्यांमागील काळोख्या विश्वात शेकडो स्वप्ने सामावली जात असताना सामाजिकदृष्ट्या नेहमी ‘डोळस’ राहणाऱ्या मोजक्या वऱ्हाडी मंडळींनी नवदाम्पत्यावर शुुभेच्छांचा वर्षाव केला.
अलका आणि संतोषचं लग्न अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरलं. ‘सत्यशोध अंधकल्याण केंद्रा’च्या एकात्मिक शिक्षण प्रकल्पातून दहावीपर्यंत शिकलेली अलका धनगर समाजातली, तर मुंबईत कष्टानं स्वत:च्या पायावर उभा राहिलेला संतोष मराठा समाजातला. हा आंतरजातीय विवाह झाला सत्यशोधकी पद्धतीने. अलका चाळीस वर्षांची तर संतोष तिच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान. डोळसांच्या जगात ज्याला ‘विजोड’ म्हटलं गेलं असतं, अशा अनेक बाबींना दृष्टिहीन नवदाम्पत्य डोळसपणाने भिडलंय. कष्टानं, एकमेकांना आधार देत जीवनातल्या चढउतारांना सामोरं जाण्यास सरसावलंय.
अलका बापूराव माने सातारा तालुक्यातल्या शेरेवाडी गावची. गावातल्या शाळेतच तिनं दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. जोडीला ‘सत्यशोध’च्या प्रकल्पामधून ब्रेल लिपी आणि दृष्टिहीनांसाठीचं खास प्रशिक्षण ती घेत राहिली. दहावीनंतर मात्र शिक्षण घेणं तिला जमलं नाही. संतोष गणपत पवार मूळचा बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातल्या धोत्रा भणगोजी गावचा. पाचवीपर्यंत बुलडाण्याच्या अंध निवासी विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर सहावी-सातवीचं शिक्षण त्यानं अमरावतीच्या डॉ. नरेंद्र भिवापूरकर विद्यालयात घेतलं. अमरावतीच्याच केशरबाई लाहोटी विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन तो मुंबईला गेला. ‘एनएसडी’ या संस्थेमध्ये व्यवसाय प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभा राहिला. संस्थेनं त्याला सीएसटीजवळ टेलिफोन बूथ सुरू करून दिलं. पार्ट टाइम टेलिफोन बूथ चालविण्या-व्यतिरिक्त संतोष मुंबईतल्या रेल्वेस्थानकांवर कटलरी विकतो. संंस्थेच्या माध्यमातून संतोषची अलकाशी ओळख झाली. दोघांनी प्रथम एकमेकांचे विचार ऐकून घेतले आणि मग संतोषनं अलकाला थेट मागणीच घातली. रविवारी त्यांनी साहचर्याला उत्साहात प्रारंभ केला.
वऱ्हाडी मंडळींमध्ये अलका आणि संतोषच्या नातलगांसह नगराध्यक्ष सचिन सारस, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ, अशोक काळे, श्रीकांत के. टी., हेमा सोनी, विजय मांडके, चंद्रकांत कांबिरे, दिनकर झिंब्रे, सागर गायकवाड, विजय निंबाळकर, राजेश नारकर आदींचा समावेश होता.

नव्या संसाराला अनेकांची मदत
नवदाम्पत्याला संसारोपयोगी साहित्य पुरविण्यासाठी अनेकांनी मदत केली. माधव सोळसकर यांनी गॅस शेगडी, एलआयसीमधील स्वाती राऊत, न्यू इंडिया इन्शुरन्समधील हर्षल राजेशिर्के आणि इतरांनी दोन सिलिंडर कनेक्शनसाठी रक्कम दिली. धनराज लाहोटी यांनी नवरदेवाला सूट दिला. संसारोपयोगी साहित्यासाठी व्यंकटपुरा भजनी मंडळ, पुष्पा देशमुख, शारदा योग मंडळ, पौर्णिमा शहा, वृषाली कुलकर्णी यांनी मदत केली. मुंबईत उभयतांना स्थिरस्थावर करण्यासाठी प्रा. वृषाली मगदूम प्रयत्नशील आहेत.

Web Title: The rise of the illusory dream of the celestial world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.