मराठा आरक्षणासाठी रिक्षावाले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:50 IST2018-08-05T23:50:37+5:302018-08-05T23:50:43+5:30

मराठा आरक्षणासाठी रिक्षावाले रस्त्यावर
कºहाड : मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान पेटले असताना कºहाडातही मोर्चा, आंदोलने काढून या मागणीचा पुनरुच्चार केला जात आहे. रविवारी शहरात रिक्षावालेही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. पन्नासपेक्षा जास्त रिक्षांची रॅली काढून त्यांनी मराठा क्रांती मोर्चास पाठिंबा दर्शविला.
कºहाड शहरासह तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची धार पोहोचली आहे. गावोगावी त्यासाठी मोर्चा, आंदोलनाचे नियोजन केले जात आहे. गत आठवड्यात याच मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या होत्या. ही परिस्थिती नियंत्रणात येताच शहरामध्ये आंदोलकांनी ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले. दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. गत चार दिवसांपासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यातच शुक्रवारी काही युवक आंदोलक कृष्णा नदीपात्रात उतरले. त्यांनी शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करीत आरक्षणाची मागणी लावून धरली. त्यावेळी दुपारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन महिलांशी चर्चा केली.
रविवारीही हे ठिय्या आंदोलन सुरूच होते. दिवसभरात अनेक संघटना तसेच मान्यवरांनी याठिकाणी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शवला. दरम्यान, आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी शहरातील रिक्षावालेही रस्त्यावर उतरले. क्रांती आॅटो रिक्षा संघटनेने शहरातून रॅली काढली. या रॅलीत पन्नासहून जास्त रिक्षा सहभागी करण्यात आल्या होत्या. प्रत्येक रिक्षावर भगवा झेंडा लावण्यात आला होता. तसेच ‘एक मराठा, लाख मराठा’ असेही लिहिण्यात आले होते. चालकांनी भगव्या टोप्या परिधान करून जोरदार घोषणाबाजी करीत या रॅलीत सहभाग नोंदवला.
शहरातील बसस्थानकापासून या रॅलीला सुरुवात झाली. दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महिलांच्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला. त्यानंतर ही रॅली दत्त चौकातून मुख्य बाजारपेठेकडे मार्गस्थ झाली.
मुख्य बाजारपेठेतील आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळामार्गे कृष्णा नाका आणि उपजिल्हा रुग्णालयासमोर विजय दिवस चौकमार्गे रॅली पुन्हा बसस्थानक परिसरात आणण्यात आली. त्याठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच रॅली मार्गावरील वाहतूकही काही काळासाठी इतर मार्गांवरून वळविण्यात आली होती. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.