निसर्गाच्या छाताडावर धनिकांचे इमले
By Admin | Updated: August 18, 2014 23:39 IST2014-08-18T22:36:01+5:302014-08-18T23:39:48+5:30
झाडांची कत्तल : महाबळेश्वर परिसरात बेकायदा बांधकामे

निसर्गाच्या छाताडावर धनिकांचे इमले
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर प्रतापगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मेटतळे एक छोटेसे गाव वसलेले आहे. या गावामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये मुंबई येथील धनिकांनी बेकायदेशीर सिमेंटचे बंगले बांधण्यासाठी अनेक वेळा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येते. यासाठी धनिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांना हाताशी धरून स्वत:चे इमले बांधले आहेत.
महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत पाचगणी व तापोळा या भागांमध्ये धनिकांची नजर होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून मेटतळे या गावाच्या सुरुवातीलाच मोठे जंगल दिसत होते. परंतु, बाहेरून थोडी फार झाडे व आतमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून भले मोठे महल उभे करण्यात आले आहे.
हे सिमेंटचे बंगले उभे करण्यासाठी गावामधील प्रतिनिधी व गावकऱ्यांना चिरीमिरी देऊन हे काम केले जाते. अनेक वेळा वृक्षतोड जेथे झाली आहे. त्याठिकाणी गावचे तलाठी यांनी पंचनामे सुद्धा केले आहे; पण त्यांच्यावर कारवाई काहीच करण्यात आली नाही. तर एका मुंबईच्या धनिकांनी भली मोठी इमारत बेकायदेशीर बांधण्यात आली आहे. त्यावरही प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली; परंतु त्यावरही काही कारवाई केली जात नाही. अशामुळे मेटतळे गावात येऊन धनिक गावकऱ्यांना लाखोंचे आमिष दाखवून जागा खरेदी करत आहेत.
प्रशासनाला लवकरात लवकर जाग येऊन मेटतळे या गावामध्ये होणारे बेकायदा बांधकाम व झाडतोड हे थांबवले पाहिजे नाही तर मेटतळ्यात हिरवाईच राहणार नाही, अशी महाबळेश्वरमधील स्थानिकामध्ये चर्चा होत आहे. तर या धनिकांवर कारवाई व्हायला पाहिजे. असेही म्हटले जात आहे. (प्रतिनिधी)
हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे मेटतळ्याच्या डाव्या बाजूला असलेला जावळीचा मकरंदगड व प्रतापगड हे विलोभनीय दृष्य मनाला मोहिनी घालत आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. साहजिकच जमिनीचा भाव ८० लाख रुपये असे एकर आहे.