तांदूळच बनला रेठऱ्याचा ‘ब्रँड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:00+5:302021-09-12T04:44:00+5:30

काही गावे ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीन्यपूर्ण लौकिकामुळे सर्वदूर ओळखली जातात. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रूक गावालाही पाच ...

Rice becomes 'brand' of rice | तांदूळच बनला रेठऱ्याचा ‘ब्रँड’

तांदूळच बनला रेठऱ्याचा ‘ब्रँड’

काही गावे ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीन्यपूर्ण लौकिकामुळे सर्वदूर ओळखली जातात. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रूक गावालाही पाच दशकांपासून ‘रेठरा बासमती’ तांदळाची नवी ओळख मिळाली आहे. ही ओळख देशभर पोहोचली असून, परदेशातही हा तांदूळ ‘ब्रँड’ ठरत आहे.

पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीकाठी रेठरे बुद्रूक गाव वसले आहे. याठिकाणी १९६१ मध्ये कृष्णा कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना विभागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला. कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाकडे कल वाढला. मात्र, १९७०च्या दशकात याच साखरपट्ट्यात ऊस सोडून ‘बासमती’ भात पीक लावण्याचा प्रयोग केला गेला आणि तो यशस्वीही झाला. त्याकाळी कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते यांनी हिमाचल प्रदेशमधील नैनिताल येथून बासमती तांदळाचे ३७० वाणाचे बियाणे आणले. ते बियाणे त्यांनी त्यांच्या शेतात पेरले. त्यानंतर बासमती तांदूळ रेठऱ्याच्या मातीत रुजला. आणि या पिकाच्या सुवासाने परिसर भरून गेला.

आबासाहेब मोहिते यांच्या शेतातील बासमती तांदळाचे पीक पाहण्यास त्यावेळी आसपासचे शेतकरी येऊ लागले. त्यानंतर पुढच्याच वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी हे पीक घेण्यास सुरुवात केली. आसपासच्या गावातही या वाणाची बीजे पसरली. सध्या दर्जेदार व सुवासिक बासमती तांदूळ येथील शिवारात मातीतील विशिष्ट गुणधर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकत असून, हा तांदूळ शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना हुकमी उत्पन्नही मिळू लागले असून, गावच्या तिन्ही बाजूला असणारे कृष्णेचे पाणी या पिकासाठी पोषक ठरत आहे.

- संजय पाटील

- चौकट

... म्हणून पिकतो तांदूळ !

खरंतर तांदूळ हे समुद्र किनारपट्टीच्या भागातील पीक मानले जाते. महाराष्ट्रात कोकण भागात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र, शास्त्रज्ञांच्या मते रेठरे गावच्या तिन्ही बाजूंनी वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्यातील बाष्पीभवनामुळे तांदूळ पिकासाठी लागणारी उपयुक्त आर्द्रता शिवारात सर्वत्र निर्माण होते. याचा फायदा तांदळाच्या चवीला व सुवासिकपणाला होतो.

- चौकट

घरोघरी सुगंध

रेठरे बुद्रूक गावातील अपवाद वगळता सर्वच शेतकरी बासमती तांदळाचे उत्पादन घेतात. सुगीच्या कालावधीत गावामध्ये प्रवेश केला की घराघरातून या तांदळाचा सुवास नक्की अनुभवता येतो.

- चौकट

दुकानाबाहेर पाट्या; दुबईतही सुगंध

सातारा, सांगली, कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या बाजारपेठेतही ‘रेठरा बासमती’ तांदळाला विशेष मागणी आहे. काही ठिकाणी तर दुकानाबाहेर ‘रेठरा तांदूळ मिळेल’ असे फलकच लावलेले दिसतात. दुबईपर्यंत या तांदळाचा सुगंध पोहोचला असून, तेथेही या तांदळाला चांगली मागणी आहे.

फोटो : १०संडे०१, ०२, ०३

कॅप्शन : प्रतीकात्मक

Web Title: Rice becomes 'brand' of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.