कास पठारावरील दुर्मीळ फुलांमध्ये रानगव्यांचे पर्यटन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:32+5:302021-09-14T04:45:32+5:30

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पठार परिसरात रविवारी पर्यटकांना रानगव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. या परिसरात रानगव्यांचे ...

Rhinoceros tourism in the rare flowers on the Cas Plateau! | कास पठारावरील दुर्मीळ फुलांमध्ये रानगव्यांचे पर्यटन!

कास पठारावरील दुर्मीळ फुलांमध्ये रानगव्यांचे पर्यटन!

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पठार परिसरात रविवारी पर्यटकांना रानगव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. या परिसरात रानगव्यांचे बऱ्याचदा दर्शन होत असते. रविवारी सकाळी गव्यांचा मोठा कळप दुर्मीळ फुलांमध्ये चरताना पर्यटकांना दिसला. त्यामुळे रानगव्यांच्या कळपाची पर्यटकांमध्ये चर्चा होती.

दि. २५ ऑगस्टपासून जागतिक वारसास्थळ कास पठार पर्यटकांसाठी खुले होऊन तब्बल दोन वर्षांनंतर पर्यटक विविधरंगी दुर्मीळ फुले पाहण्यासाठी तसेच पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कास पठारावर येताना दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या आलेल्या सलग सुट्यांमुळे कास परिसर पर्यटकांनी बहरत आहे. पठारावर पावसाची कायम संततधार, सोसाट्याचा वारा, प्रचंड दाट धुके पडत आहे. फुलांचे गालिचे व्हायलाही पावसाने अडकाठी निर्माण झाली आहे. दरम्यान, गव्यांचे दर्शन झाल्याने एक वेगळा अनुभव पर्यटकांना मिळत आहे.

कास पठार हे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. निसर्गसौंदर्य, चोहोबाजूला हिरवीगार दाट झाडी, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पर्यटनस्थळी रानगव्यांचे अधूनमधून झुंड दिसत असतात. त्यामुळे काहींना याची पर्वणी, तर काहींची भंबेरी उडते. बैल कुळातील गवा हा सर्वात मोठा प्राणी असून, कास परिसरातील दाट, घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिकांमधून बोलले जाते.

रानगवे समोर आले, तर त्यांना कोणीही हुसकावून लावण्याचा, दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना त्यांच्या मार्गाने पुढे जाऊ द्यावे. ते तेथून शांतपणे निघून जातात. त्यांना त्रास दिल्यास ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. कास पुष्पपठार परिसरात गवे दिसल्यास त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी पर्यटकांनी घ्यावी, असे आवाहन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर आखाडे यांनी केले आहे.

(चौकट)

पर्यटनप्रसंगी वन्यपशुंपासून सावध राहा...

अचानक रानगवे समोर आल्यास त्यांची कोणतीही चेष्टा करू नये. दगड अथवा काहीही वस्तू फेकू नये, चिडविण्याचा देखील प्रयत्न करू नये. त्यांच्या मार्गात अडथळा उभा न करता ते तेथून शांतपणे निघून जातात; परंतु त्यांना त्रास दिला गेल्यास ते हल्ला करतात. रानगवा समोर दिसल्यास पर्यटकांनी तेथून दूर जावे. दरम्यान, पर्यटनप्रसंगी वन्यपशुंपासून सावध राहावे, असे स्थानिक ग्रामस्थांतून बोलले जाते.

फोटो आहे..

कास पठारावर गव्यांचे दर्शन झाल्याने एक वेगळा अनुभव पर्यटकांना मिळत आहे. (छाया : सागर चव्हाण)

Web Title: Rhinoceros tourism in the rare flowers on the Cas Plateau!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.