रिव्हॉल्व्हरच्या ‘गेम’मुळे प्यादी झाली ‘वजीर’
By Admin | Updated: July 21, 2015 00:37 IST2015-07-21T00:37:09+5:302015-07-21T00:37:09+5:30
बगलबच्च्यांचेही आता खटक्यावर बोट : वादाच्या ‘ठिणगी’तून उडतोय वर्चस्ववादाचा भडका; सहा वर्षांत अनेकांवर ‘नेम’

रिव्हॉल्व्हरच्या ‘गेम’मुळे प्यादी झाली ‘वजीर’
संजय पाटील, कऱ्हाड : शहरात आजपर्यंत अनेक गावगुंडांनी ‘पथारी’ पसरली. बगलबच्च्यांना काखेत घेऊन त्यांनी गुन्हेगारी कारवाया केल्या. त्याद्वारे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला ‘ग्रहण’ लावले; पण काळाच्या ओघात यापैकी अनेकजण चितपट झाले. काही वर्षांपूर्वीचा विचार करता शहरात दोन दादांची दहशत होती. गुन्हेगारी क्षेत्रातील ‘वजीर’ बनून हे ‘दादा’ डाव मांडीत होते; पण या दादांची समर्थक असणारी काही ‘प्यादी’च मध्यंतरी ‘वजीर’ होऊन मिरवू लागली. सध्या या नवख्या वजिरांना शह देण्यासाठी आणखी काही ‘प्यादी’ खटक्यावर बोट ठेवून ‘गेम’ करायला लागलीत.
कऱ्हाडच्या गुन्हेगारी क्षेत्रात आजपर्यंत अनेक स्थित्यंतरे घडली. अनेक गल्लीदादा होऊन गेले. त्या-त्यावेळी त्यांनी शहरात दहशत निर्माण केली; पण त्यांची दहशत त्यावेळी फारकाळ टिकली नाही. पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्या गल्लीदादांमधील अनेकजण सूतासारखे सरळ आले. काही वर्षांपूर्वी शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात टोळ्यांचे प्रस्थ निर्माण झाले होते. या टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा वाद होता. त्या वादातूनच अनेकवेळा शहरात टोळीयुद्धाचा भडका उडाला. किरकोळ मारामारीची ‘ठिणगी’ पडल्यानंतर वारंवार हा वर्चस्वाचा वाद उफाळून आला. सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या हा या वादातील एका टोळीचा म्होरक्या होता. म्होरक्या म्हणून वावरताना तो त्याच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होता. तर त्याच्याविरोधात असणारी टोळीही दहशत निर्माण करून सल्याला जेरीस आणण्याचा प्रयत्न करीत होती. त्या टोळीतील एक नवखा तरुण त्यासाठी जास्तच सक्रिय होता. कोणत्याही परिस्थितीत सल्या चेप्याच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित होऊ द्यायचे नाही, याचा विडा त्याने उचलला. त्या नवख्या तरुणाला त्यावेळी त्या कथित टोळीच्या दादाने कुरवाळले. गुन्हेगारी क्षेत्रातील काही धडेही दिले. त्यामुळे अल्पावधीतच हा पोरगा सल्याच्या विरोधात बंडाचा ‘झेंडा’ घेऊन उभा राहिला.
तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव गावडे यांनी दिलेल्या प्रस्तावावरून प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशावरून सल्या चेप्या व दुसऱ्या टोळीच्या ‘दादा’ला तडीपार करण्यात आले. त्यामुळे शहरात धुमसत असलेले वर्चस्वाचे टोळीयुद्ध काहीसे थंडावले; पण दोन्ही दादा तडीपार झाल्यानंतर त्यांचा गुन्हेगारी वारसा चालविण्यासाठी त्यांनीच पोसलेले काही गावगुंड सक्रिय राहिले. त्यांनी मारामाऱ्या व दमदाटी करीत दहशत निर्माण करून आपल्या टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न चालविले होते. या कालावधीत शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी अनेक अधिकारी होऊन गेले.
जानेवारी २००९ मध्ये महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांची हत्या झाल्यानंतर कऱ्हाडातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली. सल्या चेप्याने हा ‘गेम’ केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यावेळी पोलीसही चक्रावले. संजय पाटील यांच्या हत्येनंतर काही दिवसांत एक-एक करीत पोलिसांनी सल्याची पूर्ण टोळी गजाआड केली. त्यानंतर शहरातील गुन्हेगारी कारवाया थंडावतील, अशी अपेक्षा असताना ५ मे २००९ रोजी सातारच्या शासकीय रुग्णालयात सल्यावर गोळीबार झाला. हल्लेखोराचा ‘नेम’ चुकल्याने त्यावेळी सल्या बचावला. त्यानंतर २९ आॅक्टोबर २००९ रोजी पुन्हा कऱ्हाडच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात सल्याला ‘टार्गेट’ करण्यात आले. हल्लेखोरांनी त्याच्यादिशेने गोळ्या झाडल्या. मात्र, त्यातूनही सल्या बचावला. या गोळीबार प्रकरणात अभिनंदन झेंडेच्या टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले. अभिनंदन झेंडे हा काही वर्षांपूर्वी सल्याच्या विरोधात बंडाचा ‘झेंडा’ घेऊन उभा राहिलेला. त्यावेळची खुन्नस त्याने २००९ मध्ये काढण्याचा प्रयत्न केला; पण सल्या बचावला. त्यानंतर
वारंवार सल्या व त्याच्याविरोधातील झेंडे टोळीचा खटका उडत राहिला. अभिनंदन झेंडे याच्यासोबत
त्यावेळी बबलू मानेलाही अटक झाली होती.
आॅक्टोबर २००९ मध्ये सल्यावर झालेल्या त्या हल्ल्याचा धुरळा खाली बसत असतानाच तिसऱ्यांदा सल्यावर गोळीबार झाला. ३० आॅगस्ट २०१३ रोजी सल्या कऱ्हाडच्या जिल्हा सत्र न्यायालयात एका प्रकरणाच्या तारखेसाठी आला असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या. त्यावेळी मात्र सल्याला गोळी लागून गंभीर जखमी झाला. अद्यापही त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित गोळीबार प्रकरणात भानुदास धोत्रे याच्यासह नऊ जणांना अटक झाली. त्यामध्ये अभिनंदन झेंडे याचाही समावेश होता.
आॅगस्ट २०१३ च्या त्या गोळीबारानंतर गेल्या दोन वर्षांत गुन्हेगारी टोळ्या सक्रिय राहिल्या; मात्र उघडपणे कोणीही समोर आले नाही. अशातच सोमवारी बबलू माने याच्यावर बाबर खान याने गोळ्या झाडल्या. तर जमावाने बाबर खानला त्याचठिकाणी ठेचून मारले. या घटनेमुळे कऱ्हाडात आजही गंभीर गुन्हेगारी कारवाया होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.