अवैध बांधकामाबाबत सैदापुरात ठराव
By Admin | Updated: January 2, 2015 00:23 IST2015-01-01T21:36:22+5:302015-01-02T00:23:28+5:30
ग्रामसभेत मंजुरी : दारूदुकान, परमिट रूमला यापुढे ‘ना हरकत’ दाखला नाही

अवैध बांधकामाबाबत सैदापुरात ठराव
कऱ्हाड : सैदापूर हद्दीत अनेक इमारतींच्या मंजूर नकाशात तळमजल्यावर पार्किंग असतानाही प्रत्यक्षात गाळे, फ्लॅटचे बांधकाम आहे़, अशी अनधिकृत बांधकामे पाडण्यात यावीत, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला़ दरम्यान, यापुढे नव्याने दारूदुकान अथवा परमिट रूमला ग्रामपंचायतीकडून ‘ना हरकत’ दाखला न देण्याचाही निर्णय झाला़
सरपंच राहुल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली़ पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, उपसरपंच सचिन पाटील, सदस्य बाळासाहेब जाधव, दत्तकुमार देसाई, वसंत जाधव, ग्रामसेवक काळभोर, शिवाजी जाधव, शरद जाधव, उदय थोरात, नानासाहेब जाधव आदी उपस्थित होते़
ग्रामसभेच्या सुरुवातीलाच सदस्य बाळासाहेब जाधव यांनी सैदापूर हद्दीत नव्याने होणाऱ्या दारू दुकान तसेच परमिट रूमला ग्रामपंचायतीने ‘ना हरकत’ दाखला देऊ नये, असा ठराव मांडला़ तो एकमताने मंजूर झाला़ कऱ्हाड-ओगलेवाडी रस्त्यालगत नव्याने सुरू होणाऱ्या देशीदारू दुकानाविरोधातही तेथील नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या दुकानाला ग्रामपंचायतीने दिलेली ‘ना हरकत’ दाखला रद्द करण्याचा ठराव एकमताने झाला़ या विषयामुळे त्या परिसरातील नागरिक, महिला ग्रामसभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते़
परिसरात अनेक मोबाईल टॉवर असून, त्यातील काही विनापरवाना आहेत़ टॉवरमुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने सर्वच टॉवर नागरी वस्तीपासून दूर उभे करावेत, असा ठरावही करण्यात आला़ सैदापूर गावासाठी असलेले स्वस्त धान्य दुकान कृष्णा कॅनॉल चौकात असून, ते ग्रामस्थांच्या सोयीसाठी सैदापूर सोसायटी, बेघर वसाहत आदी ठिकाणी स्थलांतरित करण्याचा ठराव झाला़ (प्रतिनिधी)