रेमडेसिविरचा ‘डोस’ म्युकरने रोखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:54+5:302021-07-20T04:26:54+5:30

सातारा : गेल्या तीन महिन्यांपूर्वी घराघरांत फक्त रेमडेसिविर हाच शब्द ऐकायला मिळायचा. इतके महत्त्व या इंजेक्शनचे होते. कारण या ...

Remedacivir's 'dose' was stopped by Mucker! | रेमडेसिविरचा ‘डोस’ म्युकरने रोखला!

रेमडेसिविरचा ‘डोस’ म्युकरने रोखला!

सातारा : गेल्या तीन महिन्यांपूर्वी घराघरांत फक्त रेमडेसिविर हाच शब्द ऐकायला मिळायचा. इतके महत्त्व या इंजेक्शनचे होते. कारण या इंजेक्शनमुळे जीव वाचतो, असे सर्वच मानायचे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकच आमच्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन द्या, असे म्हणायचे, पण आता रेमडेसिविर नको रे बाबा, असे डाॅक्टरांना सांगितले जातेय.

जिल्ह्यात मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र मृत्यूचे तांडव सुरू होते. दिवसाला ४० ते ४२ जणांचा मृत्यू होत होता. इतकी भयानक परिस्थिती त्यावेळी होती. आपल्या आप्तस्वकीयांचे जीव वाचावेत म्हणून जो तो धडपडत होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांच्या आशेचा किरण केवळ रेमडेसिविर इंजेक्शन हेच होते. हे इंजेक्शन मिळण्यासाठी केवळ साताराच नव्हे, तर परजिल्ह्यांतूनही याला मागणी होत होती. वाट्टेल ती किंमत मोजून रेमडेसिविर इंजेक्शन विकत घेतले जात होते. परिणामी काही प्रमाणात रेमडेसिविरचा काळाबाजारही झाला. इतकी मागणी या इंजेक्शनला होती, पण आता या इंजेक्शनची मागणी अचानक घटलीय. त्याचे प्रमुख कारण म्युकरमायकोसिसचा आजार. खरे तर या आजाराचा आणि रेमडेसिविरचा काहीएक संबंध नसल्याचे वैद्यकीय अधिकारी ओरडून सांगतायत, पण लोकांच्या मनात या इंजेक्शनची इतकी भीती बसलीय, ती आता जाता जात नाही. कोरोना रुग्णांवर जादा प्रमाणात गोळ्यांचा आणि इंजेक्शनचा डोस घेतल्यामुळे कोरोनापश्चात बुरशीजन्य आजार उद्‌भवल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या.

जिल्ह्यात अद्यापही म्युकरचे रुग्ण वाढतच असून, आत्तापर्यंत ४० जणांचा बळी गेला आहे, तर सध्या ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी एकंदरीत म्युकरची परिस्थिती असताना नागरिक कोरोनानंतर या म्युकरच्या दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे आर्वजून नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन आमच्या पेशंटला देऊ नका, असे डाॅक्टरांना बजावतायत. अहो म्युकरचा आणि रेमडेसिविरचा काहीच संबंध नाही, असे डाॅक्टर नातेवाइकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, पण रुग्णांचे नातेवाईक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. इतकी धडकी या इंजेक्शनची अनेकांनी घेतलीय.

चाैकट : आकडेवारी काय सांगतेय..

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तीन महिन्यांपूर्वी रेमडेसिविर इंजेक्शन दिवसाला १२० लागत होते. मात्र, आता ही संख्या २५ ते ३५ वर आली आहे. यावरून रेमडेसिविरची मागणी किती घटलीय, हे दिसून येतेय. एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर असली तरी रेमडेसिविर दिले तर पुन्हा आमच्या रुग्णाला काय होणार तर नाही ना, असं काळजीच्या सुरात नातेवाईक डाॅक्टरांजवळ बोलून दाखवत आहेत.

कोट : पूर्वीच्या तुलनेत बाधितांची संख्या सध्या कमी झाली आहे. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनबाबत अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे साहजिकच मागणी प्रचंड घटली आहे.

डाॅ. सुभाष चव्हाण- जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा.

Web Title: Remedacivir's 'dose' was stopped by Mucker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.