आरोग्यसेविका नसल्याने नियमित लसीकरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:40+5:302021-06-09T04:47:40+5:30
पुढील पिढीला गंभीर आजार उद्भवू नये किंवा आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी नियमित लसीकरण सत्राचे आयोजन गावोगावी केले ...

आरोग्यसेविका नसल्याने नियमित लसीकरण ठप्प
पुढील पिढीला गंभीर आजार उद्भवू नये किंवा आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी नियमित लसीकरण सत्राचे आयोजन गावोगावी केले जाते. शासन यासाठी विशेष निधीही खर्ची करत असते. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी ही लसीकरण सत्र होतच नसतील तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल. हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्यात तब्बल २३ लसीकरण चालतात. साधारण तीन आठवडे चालणाऱ्या या लसीकरणास आरोग्यसेविका व इतर कर्मचारी गावोगावी जाऊन लहान बालके व गर्भवतींना पेंटा, रोटा व्हायरस, बीसीजी, पोलिओ आदी लस देत असतात. तसेच शारीरिक तपासणी, औषध व आहार याविषयी माहितीही दिली जाते. लसीकरणानंतर दररोजची माहीती आॅनलाइन भरली जाते. मात्र, गत कित्येक महिन्यांपासून लसीकरणच बंद पडले आहे. त्यामुळे बालकांसह गर्भवतींच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हेळवाक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकांची मंजूर पदे ९ असताना केवळ दोनच सेविका या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या दोन्हीही सेविका कामावर नाहीत. एक सेविका महिन्यापासून रजेवर आहे, तर दुसरी सेविका कोरोनाबाधित असल्यामुळे त्या उपचारात आहेत. कंत्राटी आरोग्यसेविका एकच असून त्याही प्रसूती रजेवर गेल्याने सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एकही आरोग्यसेविका नाही. तर महिला आरोग्य सहायक दोन पदे असताना ती दोन्ही पदे रिक्त आहेत. महिला कर्मचारीच नसल्यामुळे लसीकरण ठप्प झाले आहे. तसेच गर्भवती, स्तनदा माता, प्रसूतीसाठी व इतर कारणाने आलेल्या महिला रुग्णांची गैरसोय होत आहे. कोयना भागातील एकमेव असलेल्या या हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाने आरोग्यसेवाच ‘आॅक्सिजन’वर आहे.
- कोट
हेळवाक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे ग्रामस्थांना आरोग्यसेवा देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनातील अतिरिक्त काम आणि दररोजची रुग्ण तपासणी व इतर सेवेमध्येही अडचणी निर्माण होत आहे. मागणी करूनही पुरेसे कर्मचारी मिळत नाहीत.
- सुप्रिम कांबळे
वैद्यकीय अधिकारी, हेळवाक
- चौकट
बालकांसह गर्भवतींना आजाराचा धोका
आरोग्य केंद्रामार्फत दिली जाणारी लस ही लहान बाळांना विशिष्ट वयोमर्यादेत दिली जाते. तसेच गर्भवतींनाही ठराविक महिन्यात दिली जाते. ती देण्यास उशीर झाला तर लसीचा परिणाम होत नाही. उलट आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. सध्या हेळवाक आरोग्य केंद्रामार्फत लसीकरण होतच नसल्यामुळे बालकांसह गर्भवतींना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे.