कऱ्हाड, पाटणसह ६० गावांत ‘रेड अलर्ट’!

By Admin | Updated: August 7, 2016 22:58 IST2016-08-07T22:58:47+5:302016-08-07T22:58:47+5:30

‘कोयना’ची पातळी झपाट्याने वाढणार

'Red Alert' in 60 villages including Karhad, Patan | कऱ्हाड, पाटणसह ६० गावांत ‘रेड अलर्ट’!

कऱ्हाड, पाटणसह ६० गावांत ‘रेड अलर्ट’!

गावे संपर्कहीन होण्याची भीती; जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासन सतर्क; ग्रामस्थांनाही सावधानतेच्या सूचना
कऱ्हाड : कोयना पाणलोट क्षेत्रात अजूनही संततधार सुरू असून, धरणातील पाणीसाठा क्षणाक्षणाला वाढत आहे. त्यामुळे रविवारी दुपारी धरणाचे दरवाजे उघडून सुमारे १७ हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी, पाटणसह कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांना पूरस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरस्थिती गृहित धरून प्रशासनाने या दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या सुमारे ६० गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणची धरणे, प्रकल्प, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. कृष्णा, कोयना या प्रमुख नद्यांसह उपनद्या व ओढ्यांची पाणी पातळीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ८६ टीएमसी झाला असून, पावसाचा जोर असाच राहिल्यास चार दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. मात्र, कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचे वाढते प्रमाण व धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता रविवारी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. एकाचवेळी पंधरा हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढणार आहे. सध्याही काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर वाहत आहे. त्यातच धरणातील पाणी सोडल्याने काही गावांना पुराची झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने संबंधित गावांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन शनिवारी रात्री कऱ्हाडच्या विश्रामगृहावर सातारा, सांगली व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी, सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान ‘कन्यागत पर्वकाळ’ साजरा होणार आहे. त्यासाठी सुमारे दीड लाख भाविक कृष्णा नदीत स्रानासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीचे नियोजन करणे प्रशासनाच्या दृष्टीने आवश्यक आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्यास नृसिंहवाडीत पूर येऊन सर्व देवस्थानच पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी ७ ते ९ आॅगस्ट दरम्यान जास्त पाणी सोडावे. १० ते १३ आॅगस्टला पाणी सोडू नये, अशी चर्चा यावेळी झाली.
कोयना धरणातील पाण्याची आवक, पडणारा पाऊस आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा याचा विचार करून धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच १० ते १३ आॅगस्ट दरम्यान पडणारा पाऊस, धरणातील उपलब्ध पाणी याचा विचार करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी सांगितले. रविवारी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. पाटण तालुक्यातील काही गावे नदीच्या पूर्णपणे काठावर असल्याने या गावांना पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कालावधीत अनुचित घटना घडू नये, यासाठी काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले जाणार आहे. तसेच पूल पाण्याखाली गेल्यास गावे संपर्कहीन होण्याची शक्यता गृहित धरून संबंधित गावात आवश्यक धान्य, रॉकेल, औषध पुरवठा करण्यात आला आहे.
कोयना नदीकाठावर असलेली गावे
कऱ्हाड तालुक्यात कोयना नदीकाठी तांबवे, साजूर, किरपे, केसे, म्होप्रे, साकुर्डी, येरवळे, चचेगाव, सुपने, वारुंजी तर कृष्णा नदीकाठी कालगाव, पेरले, भुयाचीवाडी, कोर्टी, खराडे, वडोली भिकेश्वर, कवठे, कोणेगाव, उंब्रज, शिवडे, तासवडे, बेलवडे हवेली, वहागाव, घोणशी, खोडशी, कऱ्हाड, गोटे, शिरवडे, नडशी, कोपर्डे हवेली, सैदापूर, सयापूर, गोवारे, टेंभू, कोरेगाव, कोडोली, कार्वे, शेरे, गोंदी, रेठरे बुद्रुक, खुबी, गोळेश्वर, कापिल, रेठरे खुर्द, मालखेड, दुशेरे, आटके ही गावे आहेत. तर पाटण तालुक्यातील हेळवाक, रासाटी, दास्तान, संगमनगर धक्का, मणेरी, नेरळे, येराड, काळोली, पाटण, मुळगावर, कवरवाडी, त्रिपुडी, चोपडी, अडूळ, नाडे, सांगवड, निसरे, मंद्रुळ हवेली ही गावे नदीकाठावर आहेत.

Web Title: 'Red Alert' in 60 villages including Karhad, Patan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.