दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी काढताहेत आल्याचे विक्रमी उत्पादन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:37 IST2021-09-13T04:37:54+5:302021-09-13T04:37:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औंध: खटाव तालुक्यातील विशेषतः औंध परिसरातील शेतकरी आता आपल्या शेतीकडे आधुनिकतेच्या नजरेने पाहावयास लागला आहे. स्वतःच ...

दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी काढताहेत आल्याचे विक्रमी उत्पादन!
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध: खटाव तालुक्यातील विशेषतः औंध परिसरातील शेतकरी आता आपल्या शेतीकडे आधुनिकतेच्या नजरेने पाहावयास लागला आहे. स्वतःच आपल्या शेताचा अभ्यास करून कोणते पीक करावे, याकडे लक्ष देऊ लागला आहे. पारंपरिक पद्धतीने पिके न घेता अधिक उत्पन्नाची बागायती पिके करून विक्रमी उत्पन्न घेण्याकडे दुष्काळी पट्टा वळू लागल्याचे दिसून येत आहे.
दुष्काळी भाग म्हणून ओळख पुसण्यास उरमोडीच्या पाण्याची मदत शेतकऱ्यांना होत आहे. जिथे कुसळे उगवत नव्हती तिथे आता आले, ऊस, वाटाणा, ढब्बूचे प्लॉट दिसू लागले आहेत. एकेकाळी उसाच्या कांड्यासाठी ट्रकच्या मागे धावणारी लहान मुले आता मोठी होऊन शेकडो टनांनी ऊस कारखान्यांना पाठवत आहेत तर चहासाठी आले बाजारातून आणणाऱ्या माऊलीची मुले आता हजारो टनाने आल्याचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे पीकपद्धती बदलू लागली आहे.
गोपूज येथील पृथ्वीराज घार्गे या शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रात २० टन आल्याचे उत्पन्न घेतले आहे. त्यासाठी शेणखत व सेंद्रियवर अधिक भर दिला आहे. वडी, औंध, पळशी याठिकाणीही शेतकऱ्यांनी आल्याचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. हळूहळू अभ्यास करून शेतकरी आता आधुनिकतेची कास धरू लागला आहे. त्यामुळे दर कमी असला तरी जास्त उत्पन्न काढून नफ्यात राहण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागला आहे; मात्र एवढ्या उत्पन्नात दर चांगला मिळाला असता तर अधिक नफा मिळाला असता, अशीही खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कोट..
माझ्या आल्याच्या उत्पादनात सेंद्रियचा सत्तर टक्के वापर केला. तर तीस टक्के रासायनिक गरजेनुसार वापरले. स्वतः जीवामृत तयार करून आले पिकाला दिल्यामुळे उत्पन्न वाढले. रोगराई कमी झाली.
-पृथ्वीराज घार्गे, शेतकरी, गोपूज
फोटो:-गोपूज येथील पृथ्वीराज घार्गे यांनी आल्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. (छाया : रशिद शेख)