अंतर्गत रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:24+5:302021-06-23T04:25:24+5:30

मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. काम झाल्यानंतरही चर मुजवण्याचे काम व्यवस्थित न ...

The realm of potholes in internal roads | अंतर्गत रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य

अंतर्गत रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य

मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. काम झाल्यानंतरही चर मुजवण्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे प्रत्येक कॉलनीत प्रवेश करताना खड्डाच प्रत्येकाचे स्वागत करत आहे. तसेच केबलच्या कामासाठी उपमार्गावर खोदलेले व पावसाने पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांसह वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले हे खड्डे तातडीने मुजविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

मसूर ते निगडीपर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय

मसूर : मसूर ते निगडी या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मसूर ते निगडी हा जवळचा रस्ता म्हणून ग्रामस्थ त्याचा वापर करतात. मात्र, गत दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने पाहणी करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

फुटलेल्या झाकणातून केमिकलची दुर्गंधी

मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या आरसीसी गटरला साफसफाई करण्यासाठी ठिकठिकाणी चेंबर तयार केले आहेत. त्या चेंबरवर झाकणेही टाकण्यात आली होती. मात्र, दर्जाहीन झाकणांमुळे येथील मोरया कॉम्प्लेक्स ते ढेबेवाडी फाटा परिसरात तीन ठिकाणी झाकण फुटून वर्ष उलटून गेले आहे. या ठिकाणचे झाकण फुटल्यामुळे नाल्यात दगड व मातीचा खच पडला आहे. त्यामुळेच या ठिकाणी नाला तुंबला आहे. शिवाय या उघड्या गटरमध्ये केमिकलमिश्रित पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन परिसरातील सर्वच चेंबरची झाकणे बदलावीत, गटर बंदिस्त करावे, अशी मागणी होत आहे.

पाटण ते चाफोली रस्त्याची दुरवस्था

पाटण : पाटण ते चाफोली रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. पाटणच्या पश्चिम बाजूकडे चिपळूण महामार्गापासून चाफोली रस्त्याला सुरुवात होते. मात्र, महामार्गापासून ग्रामीण रूग्णालयापर्यंत या रस्त्याला पावसाळ्यात अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप येते. दोन-दोन फुटांचे खोल आणि आकार वाढत चाललेले खड्डे वाहनधारक व प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत.

Web Title: The realm of potholes in internal roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.