मुलांचे वर्ष वाचले… अभ्यासाच्या आकलनाची मात्र बोंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST2021-04-05T04:34:45+5:302021-04-05T04:34:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात नेमक्या कोणत्या विषयाचे किती प्रमाणात आकलन झाले, याची माहिती परीक्षेमध्ये पडलेल्या ...

मुलांचे वर्ष वाचले… अभ्यासाच्या आकलनाची मात्र बोंब!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात नेमक्या कोणत्या विषयाचे किती प्रमाणात आकलन झाले, याची माहिती परीक्षेमध्ये पडलेल्या गुणांतून लक्षात येते. परीक्षा उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण म्हणून नव्हे तर विद्यार्थ्याच्या एकूण आकलनाची पातळी समजून येण्यासाठी आवश्यक असते. नेमकं यंदा हेच होणार नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाचा दूरगामी परिणाम मुलांना सोसावा लागणार आहे. परीक्षांविना विद्यार्थी उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असलं तरीही त्यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून न येणारं आहे. पुढील वर्गात गेल्यानंतर त्या अभ्यासक्रमात मागील वर्गांचे अनेक संदर्भ असतात. पहिल्या वर्गातील माहितीच कच्ची राहिली तर पुढच्या वर्गात त्याच्या आधारावर अभ्यास करणं कठीण जाणार आहे. वर्ग वाढतील, तशी ही काठिण्यपातळी विद्यार्थ्यांना त्रास देणारी ठरणार आहे.
वर्षभर शिकलेल्या अभ्यासाचे मूल्यांकन न करता सलग उत्तीर्ण करण्याने भविष्यात शैक्षणिक नुकसानही होऊ शकते. ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांना लिखाणाची गती हरवली आहे. त्यातच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला तर ही गती वाढविण्याकडेही मुलं दुर्लक्ष करणार ज्याचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षावर मोठ्या प्रमाणावर दिसून येईल.
हाही ठरू शकला असता पर्याय
शिक्षण विभागाने पूर्ण परीक्षा रद्द करून सरसकट मुलांना उत्तीर्ण करण्यापेक्षा कमी गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली असती तर मुलांना काय समजलं ते स्पष्ट झालं असतं. बहुपर्यायी प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात ही परीक्षा घेतली गेली असती तर मुलांना अभ्यासक्रमाचा यानिमित्ताने उजाळा मिळाला असता. त्याबरोबरच ऑनलाईन शिक्षणात आपण किती आणि काय शिकलो, याचाही आढावा गुणांच्या निमित्ताने घेता आला असता.
कोट :
१.शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र, ज्याप्रमाणे वर्षभर आपण ऑनलाईन शिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे थोड्या फार प्रमाणात परीक्षा घेतली असती तर बरे झाले असते. मुलांना पण त्याचा आनंद वाटला असता की, आम्ही ऑनलाईन शिक्षण पण घेतले आणि परीक्षाही ऑनलाईन झाली.
– दत्ता माने, पालक, खडतरे वस्ती,
२. वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिल्यानंतर त्यांच्या परीक्षाही ऑनलाईन घ्यायला काहीच हरकत नव्हती. या निमित्ताने ऑनलाईन अध्यापन मुलांच्या किती डोक्यात आणि डोक्यावर गेलं हे समजलं असतं. पण परीक्षा न घेण्याने विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासाचा सराव आणि समज या दोन्हींबाबत किती समजलं, हे वर्षभर समजूनही उपयोगच नाही.
- नेहा शिवदे, शिक्षिका, आयरन अकॅडमी, सातारा
३. शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्यासाठी शिक्षक विद्यार्थी झाले. वर्षभर ऑनलाईन शिकविलेलं मुलांना समजलं का नाही, काही त्रुटी राहिल्या असतील तर परीक्षांच्या गुणांवरून समजेल, असं गृहीत धरून आम्ही प्रश्नपत्रिका तयारही केल्या होत्या. अचानक परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाने धक्का बसला. याचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक जीवनावर होईल, याची भीती वाटते.
- मिथीला गुजर, मुख्याध्यापिका, एसईएमएस