साठेबाजीमुळेच कांद्याचे दर गगनाला..!
By Admin | Updated: August 26, 2015 21:28 IST2015-08-26T21:28:25+5:302015-08-26T21:28:25+5:30
ग्राहकांची गर्दी : घरात साठवून ठेवलेला कांदा येऊ लागला बाजारात; शेतकऱ्यांना झटपट लॉटरीचा अनुभव

साठेबाजीमुळेच कांद्याचे दर गगनाला..!
सातारा : मागील दोन महिन्यांपासून कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली आहे. कांद्याची आवक घटली असल्याचे कारण पुढे करत ही दरवाढ होत आहे. परंतु जून-जुलै मधील आलेली कांद्याची आवक बाजारातून गायब कुठे झाली? याचा कोणीही विचार केला नाही. त्यामुळे कृत्रिम टंचाई करून कांद्याचे दर वाढले असून, हा कांदा साठेबाजांनी दाबून ठेवला असल्याची शक्यता व्यापार व ग्राहकांतून वर्तवली जात आहे.पावसाळ्याच्या चार महिने म्हणजेच जून ते आॅक्टोबर महिन्यांत लागणारा कांदा हा साधरणता एप्रिल ते मे महिन्यांतच बाजारात आलेला असतो. पावसाळ्यात पडलेल्या दुष्काळ, अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक हाती लागत नाही. त्यामुळे या चारही महिन्यांसाठी लागणारा कांदा हा एप्रिल मे महिन्यांतच मोठ्या प्रमाणात येतो. उन्हाळ्यात येणाऱ्या कांद्याची आवक ही साधारणता पाच-सहा महिने पुरेल एवढी उत्पादीत झालेली असते; परंतु अलीकडे या गोष्टीचा फायदा घेत जून-जुलै महिन्यांतच आलेला कांदा साठेबाज धनदांडग्यांकडून साठवून ठेवला जातो. साधरणता जुलै-आॅगस्टपासून बाजारपेठेत कांद्याची कृत्रिम टंचाई भासवून दर वाढविला जात आहे. त्यामुळे यामागे एखादी मोठी साठेबाजांची साखळी असण्याची शक्यता व्यापारी व ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.संपूर्ण राज्यात लासलगाव, पिंपळगाव, नाशिक याठिकाणांहून कांद्याची निर्यात होते. साधारणता एप्रिल-मे महिन्यांत ठेवणीचा गरवा जातीचा कांदा हा संपूर्ण पावसाळ्यात टिकेल, असा बाजारात येतो. त्याचे दरही अगदी ८ रुपये ते १५ रुपयांप्रमाणे विक्रीला आलेला असतो. नेमके त्याचवेळी मोठ्या प्रमाणात हा कांदा बाजारातून उचलला जातो. त्यामुळे संपूर्ण राज्यात कांद्याच्या अवकाची घट दिसून येते. व कांदा हळूहळू मागणीमुळे महाग होत जातो. तर पावसाळ्यात कांद्याचे पीक अल्पप्रमाणात घेण्यात येत असल्याने बाजारात कांदा मागणी पेक्षाही कमी असल्याने दर वाढतच जातो. त्यानंतर साठेबाजांचा कांदा बाजारात दाखल होतो. साधारणता १५ रुपयांचा कांदा अगदी ७० ते ८० रुपये दराने विकला जातो. कमी वेळेत जास्त फायदा होत आहे. (प्रतिनिधी)
पावसाळ्यातच कांदा महाग का?
पावसाळ्यात एकतर दुष्काळजन्य परिस्थिती असते किंवा अतिवृष्टी असते. त्यामुळे कांद्याचे पीक सहजासहजी शेतकरी घेत नाही. याचाच फायदा घेत साठेबाज पावसाळ्यात लागणारा कांदा उन्हाळ्यात घेऊन साठवतात. व पावसाळ्यात कृत्रिम टंचाई भासवून कांद्याला अगदी शंभर रुपयांपर्यंत दर ठेवतात. साधारणता कांदा हा पाच-सहा महिने चांगला टिकतो. पावसाळ्यात वातावरण थंड असल्याने एखाद्या मोकळ्या शेडमध्ये कांदा पसरून ठेवला तर तो अगदी पाच-सहा महिने टिकतो.
शासनाने कांदा साठेबाजारांवर कारवाईचे आदेश दिले तर दुसरीकडे कांद्याचे दर आवाक्यात येण्यासाठी कांदा आयातीचा निर्णय घेतला, त्यामुळे साठेबाजांचे धाबे दणाणले. अन् कोणत्याही आयातीशिवाय बाजारात कांद्याची आवक वाढली. शासनाने काढलेल्या आदेशामुळे केवळ एकाच आठवड्यात कांद्याने दराची उंची गाठली होती. ती कमी झाली त्यामुळे कांद्याचा काळाबाजार होते हे सिद्ध होत आहे.
-राजेंद्रसिंह रजपूत, ग्राहक