Satara: माढ्यात रणजितसिंह यांच्या उमेदवारीला बेरजेची किनार; तिढा सुटला पण, विरोध मावळणार? 

By नितीन काळेल | Published: March 14, 2024 07:03 PM2024-03-14T19:03:19+5:302024-03-14T19:03:49+5:30

रामराजे अन् मोहिते-पाटील यांची भूमिका दिशा ठरविणार

Ranjitsinh Naik-Nimbalkar's candidature in Madha Lok Sabha constituency has a margin of victory, Direction will decide the role of Ram Raje and Mohite-Patil | Satara: माढ्यात रणजितसिंह यांच्या उमेदवारीला बेरजेची किनार; तिढा सुटला पण, विरोध मावळणार? 

Satara: माढ्यात रणजितसिंह यांच्या उमेदवारीला बेरजेची किनार; तिढा सुटला पण, विरोध मावळणार? 

सातारा : पश्चिम महाराष्ट्रात चर्चेत राहिलेल्या माढ्याचा महायुती अंतर्गत तिढा सुटला असून भाजपने मतदारसंघ स्वत:कडे ठेवत जोरदार विरोध असतानाही विद्यमान खासदार रणजितसिंह यांच्यावरच विश्वास दाखवलाय. यामुळे फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि अकलुजचे मोहिते-पाटीलही दुखावले जाणार असल्याने ते युती आणि स्वधर्म पाळणार की, त्यांची भूमिका वेगळी राहणार यावरच माढ्याचे गणित अवलंबून राहणार आहे.

माढा लोकसभेचा मतदारसंघ तिसऱ्यावेळीही चर्चेत राहिलाय. भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होते. पण, त्यांचे पारंपरिक विरोधक विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात गेलेले रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना ठाम विरोध केलेला. त्यांनी बंधू संजीवराजेंसाठी मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा अशी जाहीर भूमिका घेतलेली. यासाठी त्यांनी खासदार रणजितसिंह यांना पुन्हा उमेदवारी मिळू देणार नाही, असा इशाराही दिलेला. पण, राजकीय बेरजेत माहीर असणाऱ्या रणजितसिंह यांनी माणचे आमदार जयकुमार गोरे यांना बरोबर घेत मतदारसंघात योग्य फासे टाकले. त्यामुळे मतदारसंघ भाजपकडेच राहिला. त्याचबरोबर ते स्वत: पुन्हा मैदानात उतरले.

त्यांच्या उमेदवारीला अकलुजच्या मोहिते-पाटील यांचाही विरोध होता. पण, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे तत्व अंमलात आणून रणजितसिंह यांनी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्याशी दोस्ताना निर्माण केला. तसेच सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटीलही बरोबर राहिले. अशी सर्व गणिते जमून आल्याने रणजितसिंह उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले. असे असलेतरीही त्यांच्यापुढील संकट वाढतच जाणार आहे.

मागील निवडणुकीत रामराजे आघाडीत होते. तरीही रणजितसिंह यांनी फलटणमध्ये मताधिक्य घेतले होते. आता रामराजे महायुतीत असलेतरी ते युतीधर्म पाळणार का हा खरा प्रश्न आहे. कारण, महायुतीत राष्ट्रवादीचा अजित पवार गट आल्यामुळे अनेक लोकसभा मतदारसंघात ‘युती धर्म’ संकटात सापडलाय. यासाठी माढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कोणती भूमिका घेतात आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामराजेंना युतीसाठी तरी सोबत रहा असे सांगणार का ? हे महत्वाचे ठरणार आहे. तरीही युती धर्मासाठी रामराजे हे रणजितसिंह यांना साथ देतील का हेही सांगता येत नाही. कारण, दोन तलवारी एका म्यानात राहत नाहीत हेच याही निवडणुकीत दिसून येऊ शकते.

अकलुजचे रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांचे चुलत बंधू धैर्यशील हे भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक आहेत. भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास धैर्यशील यांना होता. पण, त्यांनाही डावलण्यात आले. त्यामुळे त्यांची भूमिका काय राहणार हेही महत्वाचे ठरलेले आहे. कारण, भाजपकडून उमेदवारी मिळाली नाहीतर त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही उमेदवारीची चाचपणी केल्याची माहिती समोर आली होती. आता महायुतीचे चित्र स्पष्ट झाल्याने धैर्यशील मोहिते आणि सर्व मोहिते-पाटील कुटुंबीयांची राजकीय भूमिका काय राहणार यावरच महायुतीच्या उमेदवाराची बेरीज-वजाबाकी अवलंबून आहे. सध्यातरी महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटला असलातरी महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी यावरही माढ्याची दिशा ठरणार आहे.

रामराजेंपुढे दुसराही पर्याय; शरद पवार गटात जाणार का ?

रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह हे दोघेही फलटणचे. दोघांत विळ्या-भोपळ्याचे वितुष्ट. फलटण विधानसभा मतदारसंघ खुला असताना रामराजेंविरोधात रणजितसिंह यांनी निवडणूक लढविली. तर मतदारसंघ आरक्षीत झाल्यावर रामराजे यांनी दिलेल्या उमेदवाराला रणजितसिंह यांनी ठामपणे विरोध केला. त्यामुळे आता महायुतीत दोघेही असलेतरी रामराजे युती धर्म पाळणार का हे सांगता येत नाही. कारण, राजे कार्यकर्त्यांतून संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना निवडणुकीत उभे करण्यासाठी जोरदार मागणी होत आहे.

यावर रामराजे एखादी बैठक घेऊन निर्णय घेऊ शकतात. तसेच संजीवराजेंना माढ्याच्या रणांगणात उतरवायचे असेल तर त्यांच्यासमोर दुसराही पर्याय आहे. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातही जाऊ शकतात, अशी चर्चाही सुरू झालेली आहे. त्यातच माढ्याचा महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चीत नाही. त्यामुळे शरद पवार हे संजीवराजेंना उमेदवारी देऊ शकतात. असे झालेतर माढ्याची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चीत आहे.

Web Title: Ranjitsinh Naik-Nimbalkar's candidature in Madha Lok Sabha constituency has a margin of victory, Direction will decide the role of Ram Raje and Mohite-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.