शाडूच्या बाप्पांसाठी रणरागिणी आक्रमक

By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-29T00:22:17+5:302014-06-29T00:28:42+5:30

मंगळवार तळे : पालिकेत आज सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक

Ranaragani aggressor for Shadu's father | शाडूच्या बाप्पांसाठी रणरागिणी आक्रमक

शाडूच्या बाप्पांसाठी रणरागिणी आक्रमक

सातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या व विषारी रंगांचा वापर असलेल्या गणेशमूर्तींमुळे शहरातील ऐतिहासिक तळी मरणासन्न अवस्थेत आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींच्या जागी शाडू अथवा मातीच्या मूर्ती बसविण्याचा निर्धार केला तरच पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल, हे ओळखून शाडूच्या बाप्पांसाठी सातारच्या रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत. कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून वेदांतिकाराजे भोसले यांनी रविवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.
येथील कर्तव्य सोशल गु्रप गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आग्रह धरत आहे. याला काही प्रमाणात लोकांचा प्रतिसादही मिळतोय. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही देखाव्यांच्या माध्यमातून अनिष्ठ रुढींवर कोरडे ओढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मूळ मुद्दा राहतो, तो पर्यावरणाच्या ऱ्हासाचा. भल्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनातून आपण पर्यावरणाचा ऱ्हास तरी करत नाही ना, याची खबरदारी प्रत्येकानंच घ्यायला हवी, अशी पर्यावरणप्रेमींची भूमिका आहे.
दरम्यान, सातारा पालिका व कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कुठल्याही गोष्टीची भयानकता समजल्यानंतर तरी त्याबाबतीत सावधानता न बाळगणे हे संवेदनहीनतेचे लक्षण आहे. ज्यांना त्रास होतोय ते मंगळवार पेठ वासीय गेल्या अनेक वर्षांपासून या यातना भोगत आहेत. तळ्यातील पाण्यात मूर्ती विसर्जनामुळे विषारी वायू सर्वत्र पसरल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बसविण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवसेंदिवस विभक्त कुटुंबांची संख्या वाढते तशी प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तींची संख्याही वाढत चालली आहे. पूर्वी या तळ्यात मूर्ती विसर्जन होत नव्हते असे नाही; पण पूर्वीच्या मूर्ती माती अथवा शाडूपासून बनविलेल्या असायच्या.
आता प्लास्टर आॅफ पॅरिससारख्या अविघटनशील पदार्थापासून गणेशमूर्ती बनविण्यात येतात. या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. मात्र, त्यामुळे जलप्रदूषण बळावते. (लोकमत टीम)

 

Web Title: Ranaragani aggressor for Shadu's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.