दीपक देशमुखसातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने अजित पवार यांनी राष्ट्रवादीची जिल्ह्यातील ताकद वाढवण्याचे सूक्ष्म नियोजन केले असले तरी पक्षाचे मोठे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांना कार्यक्रमाच्या बॅनरमध्येही स्थान नसल्याचे पिंपोडे येथील कार्यक्रमानंतर दिसून आले. बेरजेचे राजकारण करताना यातून रामराजेंची ताकद वजा होऊ न देण्याची कसरत आता पक्षाच्या नेत्यांना करावी लागणार आहे.अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये खासदार शरद पवार यांची साथ सोडली, त्यावेळी साताऱ्यातून रामराजे नाईक-निंबाळकर हे सर्वप्रथम त्यांच्यासोबत होते. परंतु, पुढे लोकसभेला रणजीतसिंह यांच्या उमेदवारीला त्यांनी उघड विराेध केल्यानंतर मतदारसंघातील गणिते बदलली गेली. माढ्यात धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मदतीला रामराजेंनी 'अदृश्य शक्ती' उभी केली.त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांच्या झालेल्या पराभवाचे उट्टे निघणारच होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठी अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करूनही त्यांनी शरद पवार यांच्या पक्षातून चव्हाण यांना उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे सचिन पाटील यांनी भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. रामराजे यांचे समर्थक जरी शरद पवार यांच्या गोटात गेले, तरी तांत्रिकदृष्ट्या रामराजे हे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीत राहिले. निवडणुकीनंतर भाजपचे रणजीतसिंह यांच्या विचारांचे सचिन पाटील हे राष्ट्रवादीतून आमदार झाले.फलटणच्या राजकारणातील रामराजे आणि रणजितसिंह हे दोन धुव्र महायुतीत असूनही दुरावा आहे. याचाच प्रत्यय पिंपोडे बुद्रुक येथील कार्यक्रमावेळी दिसून आला. साताऱ्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामराजे हे पत्नीची तब्येत ठिक नसल्याने आले नसल्याचे सांगितले खरे परंतु, पिंपोडेतील बॅनरवरदेखील त्यांना स्थान मिळाले नसल्याचे दिसून आले.एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी माण-खटावमधून अनिल देसाई, कऱ्हाड दक्षिणमधून ॲड. उदयसिंह पाटील अशा नेत्यांची जमवाजमव सुरू असताना फलटणमधील राष्ट्रवादीची ताकद वाढण्यासाठी अजित पवार यांना जादा लक्ष घालावे लागणार आहे. कारण फलटणचे आमदार हे भाजपचे रणजीसिंह निंबाळकर यांचे नेतृत्व मानतात. महायुतीत एकत्र नांदताना स्वत:चा पक्ष वाढवण्यासाठी रामराजे यांचीच शक्ती व युक्ती त्यांना उपयोगी पडू शकते.
आयटीच्या छाप्यांबद्दल खदखदरामराजे यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर फेब्रुवारीत आयटी विभागाने छापा टाकला होता. रघुनाथराजे यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणाची धाड पडली होती. त्याबद्दलही राजेगटात खदखद दिसत आहे.