फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली असून यावेळी दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली असल्याचे समजते. फलटण येथे रामराजे यांचे चुलत बंधू संजीवराजे व त्यांच्या गोविंद मिल्क या प्रकल्पावर दि. ५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाचा छापा पडला होता. तब्बल पाच दिवसांनंतर आयकर विभागाचे अधिकारी यांनी सरोज व्हिला सोडला. या काळात रामराजे यांनी त्यांना त्यांचे काम करू द्या, एवढंच वक्तव्य केलं होतं.रामराजे यांनी सोमवारी सकाळी मात्र, सामाजिक माध्यमांवर स्टेटस ठेवत सुरवात तुम्ही केली, मी शेवट करणारच, असा गर्भित इशारा दिला होता. संजीवराजे यांच्या निवासस्थानी झालेली कारवाई रामराजे यांना चांगलीच जिव्हारी लागली असून छाप्यातील राजकीय काटा काढण्यासाठी ते संघर्षाच्या तयारीत आहेत.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन रामराजे कोणता डाव बाहेर काढणार हा औत्सुक्याचा विषय आहे. दरम्यान, फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडी वेग घेत असून डाव आणि प्रतिडाव यामध्ये कोण बाजी मारणार हे आगामी काळच ठरवेल.
रामराजेंनी घेतली अजित पवार यांची भेट, फलटणमधील राजकीय घडामोडीना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:34 IST