कराड : एकसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटना असताना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्ना संदर्भात त्यांनी अनेक मोठी आंदोलने यशस्वी केली. पण कालांतराने याचे २ नव्हे तर ३ गट पडले. पण गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी व रयत शेतकरी संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र आले. सातारा न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीला त्यांनी हजेरी लावली. दोघेही एकाच वेळी न्यायालयात उपस्थित राहिले अन् त्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान पहायला मिळाले.पाचवड फाटा (ता.कराड) येथे सन २०१४ साली ऊस दरासंदर्भात शेतकरी संघटनेचे एक मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी साताराजवळ एक बस जाळल्याची घटना घडली होती. त्याची तारीख सातारच्या कनिष्ठ न्यायालयात बरेच वर्ष झाली सुरू आहे. सध्या त्यांची तारीख निकालावर होती. म्हणून गुरुवारी माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत सकाळी ११:३० च्या सुमारास सातारा न्यायालयात हजर होते. दोघांनी न्यायालयासमोर एकत्रितच हजेरी लावली. त्यानंतर न्यायालयाने निकाल सुनावत सर्वांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर दोघेही एकाच लिफ्टने खाली आले. शेवटी एकमेकांचा निरोप घेत आपाआपल्या पुढील कामासाठी निघून गेले.
वकिलांसोबत टिपली छबी ..न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी शेतकरी संघटनेची ही केस न्यायालयात विनामोबदला चालविणाऱ्या अँड. विजय चव्हाण यांची भेट घेतली व त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी दोघांनीही अँड. विजय चव्हाण यांच्यासोबत एक फोटो घेतला. यावेळी सचिन नलवडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
शनिवारीही आले होते एकत्र!गत आठवड्यात शनिवारी देखील या तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी,रयत शेतकरी संघटनेचे नेते,माजी मंत्री सदाभाऊ खोत व बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील एकत्रित आले होते.त्यावेळी त्यांचे एकत्रित फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले होते. त्याबाबत समाज माध्यमातून उलट सुलट चर्चाही झाल्या होत्या बरं!गाडी 'पंजाबरावां'च्या घरीगत आठवड्यात शनिवारी सुनावणीसाठी सातारला जाताना माजी मंत्री सदाभाऊ खोत हे अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांच्या टाळगाव (ता.कराड) येथील निवासस्थानी गेले होते.त्यांची तब्येत पाहून सदाभाऊंसह कार्यकर्ते भावूक झाले होते.मग सदाभाऊ खोत पंजाबराव पाटील यांना स्वतःच्या गाडीतून घेवून तारखेला पोहोचले होते. न्यायालयातून बाहेर पडताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या गाडीत बसलेल्या पंजाबराव पाटील यांच्याकडे जात त्यांची विचारपूस केली.
सन २०१३/१४ साली झालेल्या ऊस दर संदर्भात झालेल्या आंदोलनातील बस जाळलेल्या घटनेचा हा खटला मी एक तप सातारा न्यायालयात चालविला. गुरुवारी न्यायमूर्ती एस.डी. खासनीस यांनी सबळ पुराव्याच्या अभावी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत व पंजाबराव पाटील यांची निर्दोष मुक्तता केली आहे. - अँड. विजय चव्हाण (सातारा)
Web Summary : Raju Shetti and Sadabhau Khot acquitted in 2014 sugarcane price protest case. They appeared in Satara court, later expressing satisfaction. Advocate Vijay Chavan was thanked for his pro-bono services.
Web Summary : राजू शेट्टी और सदाभाऊ खोत 2014 के गन्ना मूल्य विरोध मामले में बरी। वे सतारा अदालत में पेश हुए, बाद में संतोष व्यक्त किया। वकील विजय चव्हाण को उनकी मुफ्त सेवाओं के लिए धन्यवाद दिया।