पाऊस जास्त तरीही धरणातील पाणीसाठा मात्र कमी!
By Admin | Updated: July 27, 2016 00:31 IST2016-07-27T00:15:49+5:302016-07-27T00:31:14+5:30
जोर मंदावला : गेल्या वर्षीच्या बरोबरीसाठी सात टीएमसीची गरज; थेंब-थेंब पाण्याने कोयना धरण लागले भरू

पाऊस जास्त तरीही धरणातील पाणीसाठा मात्र कमी!
सातारा/पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने धरणांतील पाण्यात म्हणावी अशी वाढ होत नाही. त्यामुळे ‘थेंबे-थेंबे कोयना भरे’ अशी अवस्था कोयना धरणाची झाली आहे. धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टीएमसीने पाणी कमी आहे.
राज्याच्या सर्वच भागात वेळेपूर्वी आणि पर्जन्यमानाच्या सरासरी १०५ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे दुष्काळी जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पावसाने लहरीपणा दाखविण्याची संधी यंदाही सोडली नाही.
जिल्ह्यात सरासरी ७ जूनपासून पावसाला सुरुवात होते. जिल्ह्याचा पश्चिम भाग असलेल्या महाबळेश्वर, पाटण, नवजा, कोयना येथे विक्रमी पाऊस पडत असतो. यातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वरमध्ये शंभर मिलिमीटर पाऊस चोवीस तासांत पडला तरी विशेष वाटत नाही; पण यंदा चक्क जून महिना कोरडा गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. काही दिवसांमध्येच कोयनेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. पाणी पातळीतवाढ होण्याचे प्रमाणही आश्चर्यकारक होते. चोवीस तासांत दोन टीएमसी, पाच टीएमसीने वाढ होत होती. त्यामुळे महिनाभरात कोयना भरेल, अशी शक्यता होती.
शंभर-दीडशे मिलिमीटर पाऊस चोवीस तासांत पडणाऱ्या महाबळेश्वर, कोयना अन् नवजामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहा मिलिमीटरच्या आतच पाऊस पडत आहे. (प्रतिनिधी)
केवळ ५६.५४ टीएमसी पाणी
४कोयना धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालाच नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत धरणात केवळ ५६.५४ टीएमसी होता. तर गतवर्षी याच दिवशी तो ६३.८८ होता.
४मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : कोयना २, नवजा ७, महाबळेश्वर ५.
गेले पाणी कुणीकडे?
४गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. तरीही धरणातील पाणी कमी आहे. त्यामुळे एवढ्या पडलेल्या पावसाचे पाणी कुणीकडे गेले हा प्रश्न आहे. धरण क्षेत्रात पडलेला एकूण पाऊस कंसात गेल्यावर्षी पडलेला मिलिमीटरमध्ये असा : कोयना २२९० (१,७५५), नवजा : २,९३१ (१,९१८), महाबळेश्वर २,३०३ (१,९३६)
४जिल्ह्यातील चार धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये कोयना, कण्हेर, मोरणा-गुरेघर, तारळी यांचा समावेश आहे.