शेती उद्ध्वस्त करणारा पाऊस ‘शासनासाठी अदृश्य’

By Admin | Updated: August 24, 2014 22:37 IST2014-08-24T21:57:20+5:302014-08-24T22:37:24+5:30

नुकसानीची पाहणी करूनही पंचनामा नाही : पर्जन्यमापकात पावसाचा थेंबही नाही मग भरपाई कसली म्हणे !

Rainfall in agriculture is 'invisible to the government' | शेती उद्ध्वस्त करणारा पाऊस ‘शासनासाठी अदृश्य’

शेती उद्ध्वस्त करणारा पाऊस ‘शासनासाठी अदृश्य’

परळी : ढगफुटी होऊ दे नाहीतर आभाळ कोसळू दे पर्जन्यमापकात पावसाची नोंद असेल तरच भरपाई मिळेल, ही पद्धत आहे प्रशासकीय कर्मचाऱ्यांची. या कार्यपद्धतीचा फटका परळी खोऱ्यातील काही गावांना बसला आहे.
परळी खोऱ्यातील काळोशी, कुरुण, करंजे तर्फ परळी या तीन गावांच्या शेजारील यवतेश्वरच्या डोंगरपट्ट्यातील सात किलोमीटरच्या अंतरात शनिवारी चार वाजता अचानक प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. यामुळे घरांची पडझड झाली. तसेच भातशेती, शेतीचे बांध वाहून गेले. पूल पाण्याखाली गेले. रस्ते खचले, नदी, नाले तुडुंब वाहिले. सुमारे एक तास जलतांडव सुरू होते. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. संसार उघड्यावर पडले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. मात्र, त्यांनी नुकसानीचे पंचनामे काही केले नाहीत. भोळ्याभाबड्या लोकांनी भरपाई मिळणार ना, असे विचारताच एका शासकीय कर्मचाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून जलतांडवाची शिकार झालेल्या ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पर्जन्यमापकात पावसाची नोंद किती झाली आहे, यावरच भरपाई मिळणार की नाही, हे ठरणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण ज्या भागात पाऊस झाला त्याठिकाणाहून सुमारे १७ किलोमीटर अंतरावरील करंडी गावात पर्जन्यमापक आहे. त्याठिकाणी पाऊसच पडला नसल्याने पर्जन्यमापकात शून्य अशी नोंद झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष मुसळधार पावसाने या गावांमध्ये मोठी हानी झाली असल्याचे दिसत असतानाही शासकीय कर्मचारी मात्र घटनास्थळापासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्जन्यमापकाच्या भरवशावर का विसंबून आहेत, याचे आकलन मात्र नुकसानग्रस्तांना होत नाही. (वार्ताहर)

Web Title: Rainfall in agriculture is 'invisible to the government'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.