पाऊस तर पळालाच; उन्हानं जळतंय पीक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 21:30 IST2015-07-16T21:30:13+5:302015-07-16T21:30:13+5:30
कोरेगाव : घेवडा उत्पादक शेतकऱ्यांची केविलवाणी परिस्थिती

पाऊस तर पळालाच; उन्हानं जळतंय पीक !
वाठार स्टेशन : रब्बी हंगामाच्या प्रारंभालाच मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या व कोरेगाव तालुक्यात सर्वत्र पेरणी प्रक्रिया गतिमान झाली; परंतु पेरणी नंतर पावसाने दडी मारल्याने आता शेतकरीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. वाढत्या उन्हामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. एकवेळ काही दिवस पाऊस नाही पडला तरी चालेल; पण ढगाळ वातावरण तरी राहावे अशीच मागणी आता कोरेगाव तालुक्यातील घेवडा उत्पादक शेतकरी करू लागला आहे.
कोरेगावच्या घेवड्यास आंतरराष्ट्रीय मानांकनाचा दर्जा प्राप्त झाल्याने यावर्षी घेवडा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून तालुक्यात घेवड्याची ७ हजार ८७३ हेक्टर या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. घेवड्यासाठी पोषक हवामान व व रिमझिम पाऊस असे वातावरण राहिल्यास पीक चांगले मिळते. यामुळे घेवडा हे कोरेगाव तालुक्याचे हुकमी पीक बनले आहे. घेवड्यास एकवेळ कमी पाऊस असला तरी चालतो; पण उन्हाचा तडाखा चालत नसल्याने घेवडा पिकास आता उन्हापासून धोका निर्माण झाला आहे.
एका बाजूने कोरेगावचा घेवडा जगाच्या बाजारपेठेत पोहोचला असताना या घेवड्याचा समावेश मात्र अद्याप शासनाच्या पीक विम्यात झाला नाही. त्यामुळे या घेवडा उत्पादक शेतकऱ्यावर हे दुहेरी संकट कोसळले आहे. त्यासाठी शासनाने या पिकाचा समावेश विम्यात करावा ही अनेक दिवसांपासूनची शेतकऱ्यांची मागणी आहे. सद्य:स्थितीत उन्हामुळे घेवड्याचे पीक वाया जाण्याचा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे.
खरीप हंगामाच्या प्रारंभी दमदार पाऊस पडलाच नसता तर किमान शेतकऱ्याचा पेरणीसाठी पैसा तरी वाया गेला नसता; पण आता मात्र पावसाची वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही. कोरेगाव तालुक्यातील घेवडा संकटात सापडला आहे.
पावसाने अगदी अजून महिनाभर दडी मारली तरी शेतातील असलेल्या ओलीवर पीक व्यवस्था जिवंत राहील; परंतु उन्हाच्या तडाख्यातून पिकांचे संरक्षण कोण करणार? हा प्रश्न आहे. (वार्ताहर)
कोरेगाव तालुक्याची शान असलेला वाघ्या घेवड्याच्या क्षेत्रात यावर्षी वाढ झाली आहे. भविष्यात या घेवड्यास मोठा लाभ होणार आहे. दिल्लीमध्ये शासनाच्या एका कार्यक्रमात कोरेगावच्या घेवड्यास अंतरराष्ट्रीय जी. आय. मानांकनाचा दर्जा मिळाल्याने एका बाजूने शेतकऱ्यांच्या या पिकाबाबत आशा पल्लवित झाल्या. तर आता सध्याच्या वाढत्या उन्हामुळे घेवड्याचे पीक हाती लागणे अवघड वाटू लागले आहे.
- मनोज कदम, शेतकरी देऊर
घेवडा वाचविण्यासाठी धडपड...
गतवर्षी कोरेगाव तालुक्यात ६ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रात घेवड्याची पेरणी झाली होती. मात्र, बाजारपेठेतील अस्थिर दरामुळे घेवड्यास योग्य बाजारभाव मिळाला नव्हता. या हंगामात ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, जवळपास ७ हजार ८७३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यावर्षी वरुण घेवड्याचे बी ५० ते ६० रुपये तर वाघा घेवड्याचे बी ८० ते १०० रुपयांपर्यंत खरेदी करून या भागातील शेतकऱ्यांनी घेवड्याची पेरणी केली आहे. मात्र आज ज्यांच्याकडे पाणी आहे, असेच शेतकरी घेवडा वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.