पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:03+5:302021-09-11T04:41:03+5:30
सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक अन् फुलांच्या वर्षावात शुक्रवारी श्रीगणेशाची घरोघरी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनामुळे यंदाही ना ढोल ...

पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला..
सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक अन् फुलांच्या वर्षावात शुक्रवारी श्रीगणेशाची घरोघरी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनामुळे यंदाही ना ढोल वाजला ना ताशा कडाडला मात्र गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. गणरायाच्या चरणी लीन होतानाच भाविकांनी ‘हे विघ्नहर्त्या जगावर ओढावलेले कोरोना महामारीचे विघ्न लवकर दूर कर’ असे साकडेही घातले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागूू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे गेल्या दोन वर्षांपासूून सण, उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. कोरोना संक्रमण कमी होताच निर्बंध देखील शिथिल करण्यात आले. उद्योग, व्यवसाय सुरू झाले. बाजारपेठ खुली करण्यात आली; परंतु उत्सवांवरील निर्बंध अद्यापही कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवासाठी देखील जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली. प्रशासनाच्या या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील भक्तांनी यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार केला.
सातारा शहरात शुक्रवारी अत्यंत साधेपणाने मात्र भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. शहरातील कुंभारवाड्यांसोबत ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रीची दुकाने लागली होती. बुकिंग केलेल्या मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच दुकानांवर गर्दी केली होती. गणरायाच्या स्वागतासाठी यंदा ना ढोल वाजला ना ताशा कडाडला मात्र, साक्षात वरुणराजाने हजेरी लावल्याने भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कोणी दुचाकीवरून तर कोणी रिक्षात, कोणी चारचाकीत तर कोणी पायी चालत लाडक्या बाप्पाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली.
(चौकट)
बाप्पाने केले विक्रेत्यांचे विघ्न दूर..
कोरोनाचा सर्वात मोठा फटका बाजारपेठेला बसला. जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने यंदा सलग तीन महिने बंद होती. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. गणेशोत्सवाच्या पूर्वी बाजारपेठ खुली झाली अन् विक्रेते, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी गेल्या दहा दिवसांत भरभरून खरेदी केल्याने व्यापारी, विक्रेत्यांचे चेहरे आनंदाने फुलले.
(चौकट)
‘एक गाव एक गणपती’
पोलीस व जिल्हा प्रशासनाने केलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या आवाहनाला जिल्ह्यातील अनेक गावांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीचे संकट पाहता अनावश्यक खर्चाला फाटा देत माण, खटाव, फलटण, कराड तालुक्यातील अनेक गावांनी यंदा ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवून सर्वांपुुढे आदर्श ठेवला.
(चौकट)
यंदा ना मंडप ना स्वागत कमानी
जिल्ह्यासह सातारा शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या डामडौलात साजरा केला जातो. आकर्षक मंडप, स्वागत कमानी उभारल्या जातात. जनजागृतीपर देखावे सादर केले जातात. कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली आहे. सातारा शहरातील शेकडो गणेशोत्सव मंडळांनी यंदा ना मंडप उभारला ना स्वागत कमानी. लहान उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशभक्तांनी कोरोनाचे संंकट दूर करण्याचे साकडे बाप्पाला घातले.
फोटो : जावेद खान