पावसानं मारलं; धोम-बलकवडीनं तारल
By Admin | Updated: November 21, 2015 00:24 IST2015-11-20T21:20:27+5:302015-11-21T00:24:48+5:30
खंडाळा तालुका : यावर्षी सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी तरीही अनेक गावांना वरदान, तलावांबरोबर विहिरीही भरल्यां

पावसानं मारलं; धोम-बलकवडीनं तारल
दशरथ ननावरे-- खंडाळा तालुक्यात दरवर्षीपेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त इतर तालुक्यातून पाण्याची टंचाई भासत आहे. मात्र, खंडाळा तालुक्यात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे अद्याप तरी टंचाई जाणवत नाही. त्यामुळे पावसाने जरी मारलं असलं तरी धोम-बलकवडीने तारलं आहे. खंडाळा तालुक्यासाठी धोम-बलकवडी वरदायिनी ठरत आहे. तालुक्यातील तलाव, विहिरी भरल्या आहेत.
खंडाळा हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून गणला जात होता. डिसेंबर उजाडला की गावोगावी विशेषत: पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत जात होता. मात्र, वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणाचे पाणी कालव्याने खंडाळा तालुक्याच्या माळरानावरून वाहू लागले आणि तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाचे चित्र पालटले. धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे असवली, अजनुज, म्हावशी, वाण्याचीवाडी, खंडाळा, हरळी, धावडवाडी, अहिरे, घाटदरे, बोरी, पाडळी, सुखेड, खेड बु।।, कोपर्डे, निंबोडी या पूर्व भागातील गावांना वरदान ठरले आहे. गावोगावी असणारे तलाव, विहिरी या पाण्यामुळे भरल्या गेल्याने केवळ पिण्याच्याच पाण्याचा नाही तर शेती पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला आहे. कधी काळी या भागात मूग, मटकी खेरीज काहीच पिकले जात नव्हते. तिथे उसासारखी पिकांचे उत्पादन वाढले आहे.
तालुक्यातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता; मात्र आता कुठेही टँकर द्यावा लागत नाही. धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याचे रोटेशन २१ दिवसांचे असते. त्यामुळे गरजेनुसार पाणी उपलब्ध होते. ठिकठिकाणी तलाव भरल्याने शेती पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. तालुक्याचा दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्यात धोम-बलकवडी प्रकल्पाचे उद्गाते राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार मकरंद पाटील यांचे योगदान आहे. या पाण्यामुळे शेती समृद्ध तर बनलीच आहे. पण, त्याचबरोबर उद्योगधंद्यांनाही याचा उपयोग होत आहे.
खंडाळा तालुक्यातील गावोगावचा पाण्याच्या टंचाईचा प्रश्न धोम-बलकवडीमुळे मिटला आहे. योग्य वेळेत धरणाचे पाणी मिळाल्याने शेतीला फायदा झाला आहे. लोकांनी मिळालेल्या पाण्याचा वापर योग्यरीतीने आणि काटकसरीने करायला हवा.
- आमदार मकरंद पाटील
धोम-बलकवडीमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली तसेच शेतीला पाणी मिळाले. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोटपाटाने शिवारात पाणी खेळल्याने शेती पिके जोरात आहेत.
-शांतीलाल दशरथे, घाटदरे
साखर कारखान्याला धोमचे वरदान...खंडाळा तालुक्यात सहकारी साखर कारखाना उभा राहत आहे. या कारखान्यासाठी लागणारा ऊस तालुक्यातच उत्पादित होत आहे. ५० ते ७० हजार टनांवरून तालुक्यात उसाचे उत्पादन पाच लाख टनांपर्यंत वाढले आहे. याचा फायदा कारखान्याला होणार आहे. कारखान्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्प वरदान ठरणार आहे.