साताऱ्यात ‘आयटीआय’साठी अर्जांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:22+5:302021-08-25T04:44:22+5:30
कमी खर्चातील शिक्षण : नोकरीची हमी असल्याने ग्रामीण भागातून वाढतेय मागणी प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आर्थिक ...

साताऱ्यात ‘आयटीआय’साठी अर्जांचा पाऊस
कमी खर्चातील शिक्षण : नोकरीची हमी असल्याने ग्रामीण भागातून वाढतेय मागणी
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आर्थिक विवंचनेतून तातडीने बाहेर पडून सक्षम होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अजूनही आयटीआय अभ्यासक्रम नोकरीदायी आहे. दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण करून खात्रीशीर नोकरी मिळवून देणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी यंदाही जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. ३ हजार ९०० जागांसाठी तब्बल ६४६६ अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशासाठी अर्ज करायला अद्याप आठ दिवस असल्याने ही यादी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आयटीआयचे ११ शासकीय आणि ७ खासगी प्रशिक्षण केंद्र आहेत. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीही येथे प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज करतात. शासकीय प्रशिक्षण केंद्रात अडीच हजार रुपयांमध्ये वर्षभराचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये पदवी संपादन करून हाताला काम मिळत असल्याने ग्रामीण भागातून याला सर्वाधिक मागणी आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आयटीआय प्रवेशासाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. प्रवेशाच्या विविध फेऱ्यांच्या माध्यमातून यंदाही प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील शासकीय आयटीआय :
शासकीय प्रवेश क्षमता : ३२३६
खासगी आयटीआय : ६६४
एकूण प्रवेश क्षमता : ३९००
आत्तापर्यंत आलेले अर्ज : ६४६६
तालुकानिहाय शासकीय प्रवेश क्षमता
सातारा : ८७६
कऱ्हाड : ९००
लोणंद : २९२
वाई : २१२
महाबळेश्वर : १०८
मेढा : १५२
दहिवडी : १०८
फलटण : १०४
खटाव : १४४
कोरेगाव : १९२
पाटण : १४८
खासगी प्रवेश क्षमता
कऱ्हाड : १८४
सातारा : ८०
पाटण : २१२
ढेबेवाडी : १००
सोमंथळी : ८८
गतवर्षीइतकाच प्रतिसाद
आयटीआय केल्यानंतर विविध कारखान्यांमध्ये नोकरीची खात्रीशीर संधी असल्याचे गणित विद्यार्थ्यांच्या डोक्यात पक्के असल्यामुळे यंदाही गतवर्षीइतकेच प्रवेश झाले आहेत. कमी कालावधीत हाताला काम देऊन कुटुंब स्थिर करण्याचा हमखास मार्ग म्हणूनही विद्यार्थ्यांनी याकडे जाण्याचा कल दर्शविला आहे.
यामुळे टिकून आहे सातत्य...!
कोविडमध्ये अनेकांच्या हातचे काम गेले, तर कोणाला पगार कपातीला सामोरे जावे लागले. या दोन्ही परिस्थितीत हातात कला असणाऱ्यांना मात्र कुठेही अडचण आली नाही, हे सत्य अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेण्याकडे कल ठेवला आहे.
कोट :
व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी अद्यापही ग्रामीण भागातील मुलांचा ओढा सर्वाधिक आहे. दोन वर्षे शिक्षणानंतर तातडीने हाताला काम देणारे शिक्षण म्हणून याला सर्वाधिक मागणी आहे. यंदाही प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा अधिकचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले आहेत.
- सचिन धुमाळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सातारा
पाच हजार रुपयांत शिक्षण आणि तातडीने हाताला रोजगार मिळवून देणारे शिक्षण म्हणजे आयटीआय. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आम्ही स्वावलंबी बनण्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागत नाही. त्यामुळे हा अभ्यासक्रम निवडण्याचे ठरवले.
- भरत मर्ढेकर, विद्यार्थी