‘कट’साठी ‘पीआरओं’ची बोली

By Admin | Updated: December 9, 2014 23:18 IST2014-12-09T21:41:26+5:302014-12-09T23:18:19+5:30

‘रेफरल बुक’चा आधार : महिनाअखेरीस हिशेब करून दिला जातो मोबदला::डॉक्टर,तुम्हीसुद्धा? : ३

The quote for the 'cut' PR | ‘कट’साठी ‘पीआरओं’ची बोली

‘कट’साठी ‘पीआरओं’ची बोली

सातारा : आलिशान हॉटेल्समध्ये पार्ट्यां अन् मेडिसिन कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून डॉक्टरांना फॉरेन टूर, महागड्या गिफ्टचे गाजर दाखवून रुग्णांना आपल्या अत्याधुनिक रुग्णालयात पाठविण्याचे आणि आपल्या कंपनीची औषधे घेण्यासाठी डॉक्टरांना प्रवृत्त करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. यासाठी काही रुग्णायालयांनी ‘पीआरओ’ची नेमणूक केली असून ते डॉक्टरांना भेटून ‘तुम्ही आम्हाला पेशंट पुरवा, आम्ही तुम्हाला इतरांपेक्षा आकर्षक ‘कट’ देऊ,’ अशी बोली लावतात.
मोठ्या रुग्णालयांमध्ये जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) हे पद निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते. आपल्या रुग्णालयातील अत्याधुनिक सोयीसुविधांबद्दल माहिती देणे हा त्यांच्या कामाचा भाग; परंतु याव्यतिरिक्त काही ‘पीआरओ’ मंडळी डॉक्टरांना भेटून ‘तुम्ही आमच्या रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी पाठविले तर आम्ही त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला ‘कट’ देऊ, असे आमिष दाखवितात. डॉक्टरांना महिनाकाठी हजारो रुपये ‘कट’ मिळतो.
मोठ्या रुग्णालयातील आधुनिक यंत्रणा, औषधे, डॉक्टरांची संख्या, फर्निचर, रुग्णालयाच्या देखभाल यावर येणारा खर्च प्रचंड मोठा असतो. त्यामुळे साहजिकच अशा रुग्णालयात उपचार पद्धती महागडी असते. आधुनिक रुग्णालयाची उभारणी करताना आलेला खर्च कोट्यवधीत असल्यामुळे गुंतवलेला पैसा परत मिळविण्यासाठी रुग्णालयात रुग्ण येणे आवश्यक असते. ‘पीआरओ’ रुग्णालयाची ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. या गरजेतूनच ‘कट’ हा शब्द तयार झाला आहे. जनरल प्रॅक्टिशनरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी आपल्या रुग्णालयाचे नाव सुचवावे, याबदल्यात संबंधित डॉक्टरला ‘टक्केवारी’ दिली जाते. यालाच डॉक्टरांच्या भाषेत ‘कट’ असे म्हटले जाते. एखादे रुग्णालय जास्त ‘कट’ देते म्हणून रुग्णाला तिथे पाठविले जाते. मात्र, अनेकदा त्याठिकाणी रुग्णाला योग्य उपचार मिळत नाहीत. तर काही रुग्णालयात आपल्याकडील औषधे वापरून उपचार खर्च आणि औषधांचे पैसे याचे एकत्रित बिल तयार करून दिले जाते. पैसे मिळविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात घडत असलेले असे गैरप्रकार थाबले पाहिजेत, अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. (लोकमत टीम)


‘कट’ नाकारणारेही डॉक्टर
आपल्याकडे आलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी किंवा ‘पॅथॉलॉजी’मध्ये तपासणी करण्यासाठी पाठविण्याच्या बदल्यात संबंधित डॉक्टरांना ‘कमिशन’ दिले जाते. मात्र, काही डॉक्टर असेही आहेत की जे ‘कमिशन’ नाकारून त्या बदल्यात रुग्णांना सवलत द्यावी, असे सुचवितात. काही डॉक्टर आपल्या जवळचा रुग्ण असल्याचे सांगून कमी पैशात उपचार करण्याची विनंती करतात.


‘रेफरल नोट’च्या माध्यमातून साटेलोटे
काही रुग्णालयाचे व पॅथॉलोजीचे ‘पीआरओ’ आपल्याकडील सोयीसुविधांची माहिती देण्याबरोबरच ‘कट’ची टक्केवारी ठरवून ‘रेफरल बुक’ डॉक्टरांना देतात. डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी किंवा उपचारासाठी ‘रेफरल नोट’वर रुग्णाची माहिती लिहून संबंधित रुग्णालयात किंवा पॅथॉलॉजीत पाठवितात.


‘कट प्रॅक्टिस’ हा प्रकार रोखण्यासाठी रुग्णालयांच्या ‘पीआरओं’नी डॉक्टरांना आमिष दाखविणे थांबविले पाहिजे. डॉक्टरांनीही अशा आमिषांना बळी न पडता रुग्णांना कमी खर्चात चांगले उपचार कसे मिळतील हे पाहावे. रुग्णालयातील उपचारपद्धतींची जाहिरात करणे गैर नाही. मात्र, रुग्ण मिळविण्यासाठी कमिशन देऊ करणे योग्य नाही.
- डॉ. अमोल आवळे

विनाप्रयास हजारोंची कमाई
‘रेफरल बुक’च्या माध्यमातून रुग्णांना ठरलेल्या रुग्णालयात पाठविले जाते. त्याबदल्यात संबंधित डॉक्टरांना दहा ते चाळीस टक्क्यांपर्यंत ‘कट’ मिळतो. एक महिन्यात पाठविण्यात आलेल्या रुग्णांची संख्या पाहून महिनाअखेरीस हिशेब होऊन संबंधित डॉक्टरला ‘पाकिट’ पोहोच केले जाते.

Web Title: The quote for the 'cut' PR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.