व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : शिवेंद्रसिंहराजे
By Admin | Updated: November 11, 2015 00:16 IST2015-11-10T22:12:59+5:302015-11-11T00:16:02+5:30
जावळी तालुका : वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : शिवेंद्रसिंहराजे
सातारा: ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, कुसापूर, खिरखंडी आदी गावांचा समावेश होत आहे. येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा आग्रहाने विचार करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा,’ अशी सूचना सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रमुख एम. एस. पंडितराव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळी तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी राम पवार, नामदेव जाधव, रामचंद्र कोकरे, किसन सपकाळ, रामचंद्र जाधव, आनंद कदम, आनंद जाधव, विशाल भोसले, यशवंत आगुंडे, अशोक मुसळे, नारायण शेलार उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने या सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यात करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र शासन केवळ ६३ खातेदारांचे पुनर्वसन करत असून, उर्वरित ५७ खातेदारांवर अन्याय करत असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे ही शासनाची आणि वनविभागाची जबाबदारी आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार संबंधित ६३ प्रकल्पग्रस्तांचे आणि भूमिहीन लोकांचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करावे. जे प्रकल्पग्रस्त परजिल्ह्यातील आहेत अशा खातेदारांचे त्या-त्या जिल्ह्यात पुनर्वसन करावे आणि जावळी तालुक्यातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात करावे,’ अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. (प्रतिनिधी)