'कृष्णा'च्या सभेत धक्काबुक्की

By Admin | Updated: September 29, 2014 23:58 IST2014-09-29T23:54:15+5:302014-09-29T23:58:20+5:30

चप्पलफेक : अभूतपूर्व गोंधळ; सभा गुंडाळली; विरोधकांना गेटवरच अडविले

Pushing at Krishna's meeting | 'कृष्णा'च्या सभेत धक्काबुक्की

'कृष्णा'च्या सभेत धक्काबुक्की

कऱ्हाड : शिवनगर (ता़ कऱ्हाड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत विरोधकांना गेटवरच अडविल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला़ सत्ताधारी, विरोधकांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार धक्काबुक्की तसेच चप्पलफेक झाली़ या हमरीतुमरीनंतर अवघ्या सात मिनिटांत सभा गुंडाळण्यात आली़ दरम्यान, यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.
कृष्णा कारखान्याच्या कारभारावर टीका करीत माजी अध्यक्ष डॉ़ इंद्रजित मोहिते यांनी पंधरा दिवसांपूर्वी कारखाना कार्यस्थळावर सभासदांसह जाऊन आपले ८५ प्रश्न वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने लेखी स्वरूपात विचारले होते़ त्यामुळे आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी होण्याची दाट शक्यता होती़
आज, सोमवारी सकाळपासून कारखाना परिसरात तणावपूर्ण वातावरण होते़ त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता़ माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ़ इंद्रजित मोहिते यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक एकत्रितपणे सभेसाठी कार्यस्थळावर दाखल झाले़ तत्पूर्वी सभामंडपात सत्ताधारी गटाचे सभासद बसले होते़ मदनराव मोहिते व इंद्रजित मोहिते मंडपाच्या प्रवेशद्वारावर येताच त्यांना अडविण्यात आले़ त्यावरून समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली़ काही मिनिटांतच प्रतिघोषणा ऐकू येऊ लागल्या़ धक्काबुक्की, हमरीतुमरी करीत व्यासपीठाच्या दिशेने चप्पलफेक सुरू झाली़ अशातच मंजूर-मंजूरच्या घोषणा होऊन सभाही गुंडाळण्यात आली़ या प्रकारामुळे सभेसाठी उपस्थित असणारे सभासद मात्र तेथून निघून गेले़ सत्ताधारी आणि विरोधकांचे समर्थक मात्र सभास्थळीच थांबून होते़ त्यांच्यातच जोरदार घोषणाबाजी सुरू होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Pushing at Krishna's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.