पुसेगावनगरीत लोटला भक्तीचा सागर
By Admin | Updated: July 7, 2015 01:03 IST2015-07-07T01:03:50+5:302015-07-07T01:03:50+5:30
महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ : मिरवणुकीत हत्ती, घोडे, वारकऱ्यांसह विद्यार्थ्यांचा सहभाग

पुसेगावनगरीत लोटला भक्तीचा सागर
पुसेगाव : विश्वशांती व विश्वकल्याणासाठी येथील सेवागिरी देवस्थान टस्ट्रतर्फे रविवारपासून सात दिवस चालणाऱ्या एकादश कुंडी अतिरूद्र स्वाहकार जप अनुष्ठान महायज्ञाला शोभायात्रेने प्रारंभ झाला. या सोहळ्यानिमित्त पुसेगावनगरीत भक्तीचा सागर लोटला होता.
घरोघरी अंगणात सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती. तसेच गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी ९ वाजता श्री सेवागिरी मंदिरात करवीर पीठाचे श्री शंकराचार्य यांच्या हस्ते सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आ. शशिकांत शिंंदे, आ. प्रभाकर घार्गे, आ. जयकुमार गोरे, विलासराव उंडाळकर, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अॅड. विजयराव जाधव उपस्थित होते.
सकाळी साडेनऊ वाजता रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. बँड पथक, हत्ती, घोडे अग्रभागी असलेल्या या मिरवणुकीत विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. डोक्यावर तुलसीवृंदावन व कलश घेतलेल्या पंचक्रोशीतील महिला, तसेच नागरिक, भाविक हरिनामाचा गजर करत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यज्ञाचे पौरोहित्य नंदकुमार जोशी करणार आहेत. (वार्ताहर)