मसूरच्या अंगणवाडीतील चिमुरड्यांना मिळणार शुद्ध पाणी
By Admin | Updated: July 7, 2015 20:57 IST2015-07-07T20:57:33+5:302015-07-07T20:57:33+5:30
सामाजिक कार्य : मुलाच्या वाढदिवसाच्या खर्चातून दिले उपकरण

मसूरच्या अंगणवाडीतील चिमुरड्यांना मिळणार शुद्ध पाणी
मसूर : दुषित पाण्यामुळे माणसाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थी मिळेल तेथील पाणी प्यावे लागत असल्याने अनेक आजारांना ते निमंत्रण देत असतात. लहान वयातच बालकांना शुध्द पाणी पिण्याची संधी मिळावी. गंभीर आजारापासून त्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने मसूरमधील एका चिमुकलीने वाढदिवसानिमित्त तर एका पालकाने सामाजिक बांधिलकीतून दोन अंगणवाडयांना शुध्द पाण्यासाठी वॉटर फिल्टर भेट देवून अनोखा दातृत्वाचा आदर्श इतरांसमोर ठेवला.
मसूर ता. कऱ्हाड येथील आदर्श अंगणवाडी क्र. १३५ या अंगणवाडीत रसीक पटेल यांचा पाल्य शिकत आहे. पटेल हे आपल्या सामाजिक भावनेतून सतत या अंगणवाडीस खाऊ व गणवेश वाटप करतात. नुकताच त्यांनी अंगणवाडीतील मुलांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी स्वखर्चातून एक जलशुद्धीकरण उपकरण भेट दिला आहे.
अंगणवाडी केंद्र क्र. १३२ या अंगणवाडीत शिकणारी सई अमित चव्हाण या चिमुकलीने आपल्या वाढदिवसानिमित्त शुध्द पाणी पिण्यासाठी या अंगणवाडीस एक वॉटर फिल्टर देऊन मुलांना वहयांचे वाटप करून या चिमुकलीने लहान वयातच सामाजिक सेवाभावनेचा एक वेगळा आदर्श घालून दिला.
यावेळी बोलताना मसूर बिटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना केंजळे म्हणाल्या, ‘शासनाच्या माध्यमातून अंगणवाडीतील मुलांना पोषण आहाराबरोबरच अनेक उपक्रम राबविण्यात येऊन कुपोषण मुक्ती करण्यावर भर देऊन बालकांना शालेय शिक्षणाची सवय लावण्यात येत आहे. यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. पालकांनी आपल्या पाल्यास शासनमान्य अंगणवाडीतच घालून शासनाच्या उपक्रमांचा लाभ घ्यावा.’
अंगणवाडी सेविका संगीता गुरव व सुवर्णा भिलारे यांनी पालकांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ते जपून वापरण्याची ग्वाही देण्यात आली.
मदतनीस रंजना गुरव यांनी स्वागत केले तर स्रेहल गिरी यांनी आभार मानले. (वार्ताहर)