मोत्यांपरी दातांना डाग किडीचा!
By Admin | Updated: July 6, 2015 00:19 IST2015-07-05T21:52:11+5:302015-07-06T00:19:35+5:30
सातारकरांचे दंत आरोग्याकडे दुर्लक्ष : पालकांच्या निष्काळजीपणामुळे सत्तर टक्के मुलांचे दात किडलेले; नियमित तपासणी गरजेची

मोत्यांपरी दातांना डाग किडीचा!
सचिन काकडे -सातारा -व्यक्तीला आयुष्यभर साथ देणाऱ्या दातांना विशेष महत्त्व आहे. मात्र, स्वत:बरोबरच आपल्या मुलांच्या दातांच्या काळजीकडे सातारकर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. अडीच ते सहा वर्षे वयोगटातील शंभर पैकी ७० मुलांचे दात कमकुवत व कीडलेले आहेत. मात्र केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच पालकच आपल्या चिमुरड्यांच्या दातांची योग्य ती काळजी घेतात. मोत्यांपरी दिसणाऱ्या दंतपक्तीला किडीचा डाग लागल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
दातांची योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दंतवैद्यदेखील नागरिकांना याबाबत सल्ला देतात. मात्र, पालक स्वत:बरोबरच आपल्या पाल्याच्या दातांकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. सातारकर या बाबीकडे दुर्लक्ष करून दंत विकारांना निमंत्रण देत आहेत.
दात, दाढेला कीड लागल्यास निर्माण होणाऱ्या वेदना असह्य असतात. अडीच ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचे दात दुधाचे असतात. वेळेनुसार ते पडतातही. असे सांगत पालक मुलांच्या दातांच्या काळजीकडे दुर्लक्ष करीत आहे. निष्काळजीपणामुळे जवळपास ऐंशी टक्के मुलांच्या दातांना कीड लागते. पंधरा टक्केच पालक दंतवैद्यांकडे जातात. यामधीलही केवळ दहा टक्के पालकच उपचाराला तयार होतात. त्यामुळे पालकांचा निष्काळजीपणा चिमुरड्यांच्या पथ्यावर पडत आहे.
कीड मोठी असल्यास दातांचे ‘रुट कॅनल’ केले जाते. तीन ते सहा वर्षांच्या मुलांचेही ‘रुट कॅनल’ करून त्यांच्या दातांची कार्यक्षमता वाढवली जाते. दात एकावर एक अशा तीन थरांचा बनलेला असतो. सर्वात वरचा थर इनॅमल, मधला थर डेंटिन आणि आतला थर म्हणजे दाताचा गाभा. या गाभ्यामध्येच दातांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, संवेदना पोहचविणारे मज्जातंतू, पेशी इत्यादी गोष्टी असतात. दाताच्या मुळामध्ये असलेला हा गाभा ज्या पोकळीत वसलेला असतो त्याला रुट कॅनल म्हणतात. या गाभ्यामध्ये कीड पोहचल्यास ‘रुट कॅनल’ या पद्धतीने दात वाचविता येतो.
पालकांनी मुलांच्या आरोग्यसाठी त्यांच्या खाण्यापिण्याबरोबच त्यांच्या सवयी आणि प्रामुख्याने त्यांच्या दातांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
काय करावे,
काय टाळावे
दातांना चिकटणारे पदार्थ टाळावे
अती गोडही हानीकाकरण
जेवणानंतर चुळ भरावी
दिवसातून दोनदा ब्रश करावा
वर्षातून एकदा दातांची तपासणी करावी
पाणी जास्त प्यावे
चहाचे प्रमाण कमी करावे
अती थंड पदार्थ खाऊ नयेत.
कीड दोन प्रकारची असते. एक नर्सिंग कीड तर दुसरी रॅम्प्टन्ट. मुलांच्या दातांचा किडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना कमी गोड खायला द्यावे. दिवसातून दोनवेळा ब्रश करावा. ब्रश करताना शक्यतो लहान मुलांसाठी असलेल्या कोलगेटचाच वापर करावा. पालकांनी काळजी घेतल्यास चिमुरड्यांच्या दातांचे किडीपासून संरक्षण होऊ शकते.
- डॉ. ऐश्वर्या मोरे,
डेंटल सर्जन, सातारा
असा होतो
दंतविकास
दुधाच्या दातांची संख्या वीस असते. लहान मुल सहा महिन्यांचे झाले की दुधाचे दात येण्यास सुरुवात होते. ते अडीच ते तीन वर्षांचे होईपर्यंत सर्व दात व दाढा तोंडात उगवलेल्या असतात. वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षांनंतर दुधाचे दात पडू लागतात. आणि पंधरा वर्षांपर्यंत त्याजागी नवीन मजबूत दात येतात. सर्वात शेवटी येते ती अक्कलदाढ साधारणत: वयाच्या बाविसाव्या वर्षी अक्कलदाढ उगवते.