चड्डी-बनियान टोळी ताब्यात
By Admin | Updated: March 20, 2016 00:21 IST2016-03-20T00:21:12+5:302016-03-20T00:21:12+5:30
म्हसवडमध्ये दरोड्याचा प्रयत्न : सीसीटीव्हीतील फुटेज आले कामी

चड्डी-बनियान टोळी ताब्यात
म्हसवड : येथील बसस्थानक परिसरात असलेल्या बंगल्यावर गेल्या आठवड्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेल्या चड्डी-बनियान टोळीतील तिघांना म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता मंगळवार, दि. २२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात
आली.
अर्जुन सिंग, गुरुचरण सिंग, सतराम सिंग (सर्व रा. हरियाना) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, म्हसवड शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या बसस्थानक परिसरात महावीर पिसे यांचा बंगला आहे. शुक्रवार, दि. ११ रोजी रात्री दोनच्या सुमारास सहाजणांच्या टोळीने बंगल्यात प्रवेश केला; परंतु दरवाजा उघडण्यात यश आले नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
दरवाजा उघडण्याचा त्यांचा प्रयत्न बंगल्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. बुधवार, दि. १६ रोजी रात्री रात्रगस्त सुरू असताना सातारा-पंढरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ तीन संशयितांना ताब्यात घेतले. या तिघांना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.