काळज-मुरूम रस्त्याची खड्ड्यांनी दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:56+5:302021-04-01T04:39:56+5:30
फलटण : वेगाने विकसित होत असलेले फलटण आणि फलटणमधील गावांचा होणारा विकास प्रगतीच्या दिशेने जाणारा आहे. परंतु आजही ...

काळज-मुरूम रस्त्याची खड्ड्यांनी दुरवस्था
फलटण : वेगाने विकसित होत असलेले फलटण आणि फलटणमधील गावांचा होणारा विकास प्रगतीच्या दिशेने जाणारा आहे. परंतु आजही अशी अनेक गावे आहेत, जी फलटणच्या विकासाच्या मुख्य प्रवाहापासून खूपच लांब आहेत. यापैकीच काळजवरून तडवळे मुरूम तसेच रावडीकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था नागरिक व वाटसरूंना त्रासदायक ठरत आहे.
पुणे-पंढरपूर महामार्गावरील काळज हे एक छोटेखानी व टुमदार गाव. येथूनच महामार्गाला तडवळे, मुरूमकडे जाणारा रस्ता आहे. परंतु हा रस्ता खड्ड्यांनी इतका खराब झाला आहे की, दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यात काही ठिकाणी पडलेले खड्डे एक फुटापेक्षा मोठे आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनचालक यामुळे त्रस्त आहेत.
काळजवरून मुरूममार्गे सोमेश्वरकडे जाण्यासाठी म्हणजेच जिल्हासीमा ओलांडण्यासाठी या प्रमुख मार्गाचा वापर केला जात होता. आता मात्र वाहनचालक या मार्गाने जाणे टाळत आहेत. तरीही तडवळे मुरूम आणि रावडीला जाणाऱ्या वाहनांसाठी हाच मार्ग वापरावा लागत आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी त्वरित हा रस्ता पुन्हा करावा व तोपर्यंत खड्डे तत्काळ भरावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
कोट..
काळज-तडवळे-मुरूम हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याला पडलेले मोठ-मोठे खड्डे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. हा रस्ता त्वरित नव्याने करावा व नागरिकांचा होणारा त्रास थांबवावा.
- वसीम इनामदार, व्यावसायिक, काळज
फोटो...
३१फलटण
काळज-मुरूम रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याने नागरिक व वाटसरूंना त्रासदायक ठरत आहे.