डेरवणमधील फरशी पुलाची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:10+5:302021-06-26T04:26:10+5:30
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील डेरवण गावची वाट बिकट बनली आहे. डेरवणसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीने गावाला ...

डेरवणमधील फरशी पुलाची दुरवस्था!
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील डेरवण गावची वाट बिकट बनली आहे. डेरवणसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीने गावाला जोडणाऱ्या चिकुल ओढ्यावरील फरशी पुलाची दुरवस्था झाली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे साकव पूल बांधण्यासाठी भरीव निधी मिळवून देण्याची मागणी सरपंच आशा यादव यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. चाफळ विभागात डेरवण गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजले जाते. गेली अनेक वर्षे या गावाने मंत्री देसाई गटाची पाठराखण केली आहे व आजही करत आहे. एकेकाळी नेत्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची परवड काही थांबता थांबेना. डेरवण फाटा येथून शंभर मीटर अंतरावर असलेल्या चिकुल ओढ्यावरील कमी उंचीचा मोरी पूल आहे. जोरदार पावसात ओढ्याचे पाणी या पुलावरून वाहत असते. सतत हा पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून पायी चालणेही जिकरीचे व धोकादायक बनले आहे. याठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. येथील रस्ता बंद होण्याच्या मार्गावर असून, डेरवणसह भैरेवाडी गावाचा संपर्क यामुळे तुटणार आहे.
(कोट..)
डेरवण गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील चिकुल ओढ्यावरील मोरी पूल कमी उंचीचा आहे. त्यातच ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने हा पूल सतत पाण्याखाली जातो. याठिकाणी नवीन साकवपूल बांधण्यासाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत प्रस्ताव पाठवला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून तातडीने या कामासाठी भरीव निधी मिळवून द्यावा.
- आशा यादव, सरपंच, डेरवण
२५चाफळ
डेरवणमधील फरशी पूल सतत पाण्याखाली जात असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. (छाया : हणमंत यादव)